साताऱ्यात दहशतवादी असल्याचा मुंबई नियंत्रण कक्षाला फोन
By दत्ता यादव | Published: February 10, 2024 09:46 PM2024-02-10T21:46:39+5:302024-02-10T21:46:51+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे १९ फेब्रुवारीला सातारा दौऱ्यावर येणार आहेत. त्यामुळे प्रचंड खळबळ उडाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला साताऱ्यात दहशतवादी असल्याचा फोन शुक्रवारी मध्यरात्री आला. या प्रकरणानंतर सर्वच यंत्रणा कामाला लागली. फोन करणाऱ्याचा शोध पोलिसांनी घेतल्यानंतर संशयिताची मानसिक स्थिती चांगली नसल्याचे समोर आले.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे १९ फेब्रुवारीला सातारा दौऱ्यावर येणार आहेत. त्यामुळे प्रचंड खळबळ उडाली.
याबाबत अधिक माहिती अशी, मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला साताऱ्यात काही दहशतवादी असून, त्यांच्याकडे रडार आहे, असा फोन शुक्रवारी मध्यरात्री आला. खूप मोठे काही तरी घडणार असल्याचे फोनवरुन सांगण्यात आले. रडार असल्याच्या माहितीमुळे सर्वच पोलिस यंत्रणेसह प्रशासकीय यंत्रणाही कामाला लागली. पोलिसांनी तातडीने मुंबई गुन्हे शाखा तसेच सातारा पोलिस व रात्री गस्तीवर असलेल्या पोलिसांना याबाबतची माहिती देऊन अलर्ट केले.
त्यानंतर फोन करणाऱ्या व्यक्तीची माहिती मिळविण्यात आली. त्यास मुंबईतील टिळकनगर पोलिसांनी ताब्यात घेतले. संशयिताची चौकशी करून त्याच्या नातेवाइकांशीही पोलिसांनी संपर्क साधला. सात वर्षांपूर्वी संशयित व्यक्तीच्या पत्नीचे निधन झाले असून, तेव्हापासून त्याची मानसिक स्थिती चांगली नसल्याचे संशयित व्यक्तीच्या जावयाने पोलिसांना सांगितले. संशयित व्यक्ती मुंबईमध्ये बहिणीकडे वास्तव्याला असल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या तपासात समोर आली.