Satara: शेंद्रेजवळ कारची ट्रकला धडक; एकजण ठार, पाच गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2024 02:12 PM2024-10-02T14:12:58+5:302024-10-02T14:13:31+5:30
अंत्यविधीला जाताना घडली घटना: जखमी सांगली, चिपळूणमधील रहिवासी
सातारा : पुणे येथील नातेवाईकाच्या अंत्यविधीला जात असताना महामार्गाच्या कडेला अंधारात उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागून कारने जोरदार धडक दिल्याने कारमधील एका वृद्धाचा जागीच मृत्यू झाला, तर पाच जण गंभीर जखमी झाले. हा अपघात मंगळवार, दि. १ रोजी पहाटे साडेचार वाजता शेंद्रे, ता. सातारा येथे झाला. अपघातग्रस्त सांगली आणि चिपळूणमधील रहिवासी आहेत. त्यांच्यावर साताऱ्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
विठ्ठल गोविंद तारळेकर (वय ७६, रा. झुलेलाल चाैक, सांगली) असे अपघातात ठार झालेल्या वृद्धाचे नाव आहे. तर पूजा नितीन तारळेकर (वय ३०), त्यांचा मुलगा देवांश नितीन तारळेकर (वय अडीच वर्ष), नितीन विठ्ठल तारळेकर (वय ३६, सर्व रा. झुलेलाल चाैक, सांगली), राजेश्वरी महेंद्र लोकरे (वय १६), विरधवल महेंद्र लोकरे (रा. निवळी, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) अशी जखमींची नावे आहेत.
हे सर्वजण सांगलीवरून कारने (एमएच १० बीएम ४२४८) पुण्यातील नातेवाईकाच्या अंत्यविधीला निघाले होते. यावेळी नितीन तारळेकर हा कार चालवित होता. शेंद्रे, ता. सातारा गावच्या हद्दीतील राजस्थान ढाब्यासमोर आल्यानंतर महामार्गाच्या कडेला अंधारात उभ्या असलेल्या ट्रकला त्यांच्या कारची पाठीमागून जोरदार धडक बसली.
यामध्ये कारच्या पुढच्या सीटवर बसलेली पूजा तारळेकर त्यांचा मुलगा देवांश यांच्या डोक्याला गंभीर जखम झाली. तर कारमध्ये पाठीमागे बसलेली राजेश्वरी, वीरधवल आणि विठ्ठल तारळेकर यांच्याही डोक्याला, हाता पायाला गंभीर जखम झाली. जखमींना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, विठ्ठल तारळेकर यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. सर्व जखमींवर सिव्हिलमध्ये प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना साताऱ्यातील एका खासगी दवाखान्यात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.
या अपघाताची सातारा तालुका पोलिस ठाण्यात नोंद झाली असून, अज्ञात ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार किशोर वायदंडे आणि हवालदार विशाल माेरे हे अधिक तपास करीत आहेत.