नोकरीच्या आमिषाने युवकांना गंडा, ठाण्यातील दाम्पत्यासह सांगलीच्या एकावर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2022 05:00 PM2022-08-23T17:00:34+5:302022-08-23T17:04:54+5:30

आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर निलेश शेवाळे व शुभम पवार हे चौगुले दाम्पत्याच्या कार्यालयात गेले असता त्याठिकाणी त्यांना शिवीगाळ, मारहाण करण्यात आली.

A case has been filed against a couple from Ganda, Thane and one from Sangli for luring the youths with jobs | नोकरीच्या आमिषाने युवकांना गंडा, ठाण्यातील दाम्पत्यासह सांगलीच्या एकावर गुन्हा दाखल

नोकरीच्या आमिषाने युवकांना गंडा, ठाण्यातील दाम्पत्यासह सांगलीच्या एकावर गुन्हा दाखल

Next

कऱ्हाड : मर्चंट नेव्हीमध्ये भरती करण्याचे आमिष दाखवून तीन युवकांची आठ ते दहा लाखांची फसवणूक करण्यात आली. याबाबत कऱ्हाड ग्रामीण पोलीस ठाण्यात ठाण्यातील दाम्पत्यासह सांगली जिल्ह्यातील एकावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

नीलेश लालासाहेब शेवाळे (रा. शेवाळवाडी-म्हासोली, ता. कऱ्हाड) याने याबाबतची फिर्याद पोलिसात दिली आहे. त्यानुसार भीमराव चौगुले (रा. पणुंब्रे, ता. शिराळा, जि. सांगली), अमोल बाबा गोसावी व अनिता अमोल गोसावी (दोघेही रा. साकेत रेसिडेन्सी, डी. बी. चौक, कल्याण वेस्ट, ठाणे) यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेवाळवाडी येथील नीलेश याची त्यांच्याच गावातील सेवानिवृत्त सैनिक दिनकर शेवाळे यांनी डिसेंबर २०१८ मध्ये पणुंब्रेतील भीमराव चौगुले याच्याशी ओळख करून दिली. भीमराव चौगुले हा युवकांना सैन्यदलात भरती करतो, असे त्यावेळी नीलेशला सांगण्यात आले होते. चौगुले याने ठाणेतील अमोल गोसावी व त्याची पत्नी अनिता गोसावी यांच्याशी नीलेशची ओळख करून दिली.

गोसावी दाम्पत्याचे वाशी-नवी मुंबई येथे कार्यालय होते. त्याठिकाणी जाऊन नीलेशने त्याबाबत चर्चा केली. मर्चंट नेव्हीमध्ये भरती करतो, असे त्या दोघांनी सांगितल्यानंतर नीलेशने त्याचे मित्र शुभम मारुती पवार (रा. पिंपरी, ता. कोरेगाव) व प्रशांत विठ्ठल पाटील (रा. म्हासोली) यांनाही त्याबाबत सांगितले. त्या दोघांनीही नेव्हीमध्ये भरती होण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार नीलेश, शुभम व प्रशांतला चौगुले दाम्पत्याने प्रशिक्षणासाठी बोलवले.

५ जानेवारी ते २३ जानेवारी २०२१ या कालावधीत त्या तिघांना प्रशिक्षणही देण्यात आले. त्यानंतर भरती होण्यासाठी प्रत्येकी तीन लाख रुपयांची मागणी करण्यात आली. त्यानुसार तिघांनीही पैसे भरले. २९ जुलै २०१९ रोजी या तिघांना दुबईला जाण्यासाठी विमानाचे तिकीटही पाठविण्यात आले. मात्र, दुबईला न पाठवता त्यांना ७ ते ८ महिने मुंबईतच रहायला लावले. आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर सोमवारी निलेश शेवाळे याने ग्रामीण पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दिली आहे.

मुंबईत युवकांना बेदम मारहाण

आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर निलेश शेवाळे व शुभम पवार हे चौगुले दाम्पत्याच्या कार्यालयात गेले असता त्याठिकाणी त्यांना शिवीगाळ, मारहाण करण्यात आली. याबाबत त्या दोघांनी ९ ऑगस्ट २०२१ रोजी खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून चौगुले दाम्पत्यावर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: A case has been filed against a couple from Ganda, Thane and one from Sangli for luring the youths with jobs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.