Satara: मतदानावेळी प्रचाराच्या चिठ्ठ्या वाटल्या, चौघांवर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2024 11:57 AM2024-05-10T11:57:44+5:302024-05-10T11:58:15+5:30
कऱ्हाड : उंडाळे (ता. कऱ्हाड) येथे मतदान केंद्राबाहेर उमेदवाराच्या प्रचारार्थ चिठ्ठ्या वाटणाऱ्या चौघांवर ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात ...
कऱ्हाड : उंडाळे (ता. कऱ्हाड) येथे मतदान केंद्राबाहेर उमेदवाराच्या प्रचारार्थ चिठ्ठ्या वाटणाऱ्या चौघांवर ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच संबंधितांकडून प्रचाराच्या चिठ्ठ्याही पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. याबाबत पोलिस हवालदार प्रवीण बाळकृष्ण काटवटे आणि मंडल अधिकारी विलास अंतू थोरात यांनी फिर्यादी दिल्या आहेत.
हवालदार प्रवीण काटवटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सुहास रामचंद्र पाटील, धनाजी सदाशिव पाटील आणि अक्षय राजेंद्र पाटील (तिघेही, रा. उंडाळे) यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, उंडाळे येथील मतदान केंद्रावर हवालदार प्रवीण काटवटे हे कर्तव्य बजावत असताना केंद्राबाहेर संबंधित तिघेजण उमेदवाराच्या प्रचारार्थ मतदारांना चिठ्ठ्या वाटत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. हवालदार काटवटे यांनी त्या ठिकाणी जाऊन पाहिले असता त्या तिघांकडे उमेदवाराचा फोटो, चिन्ह आणि मतदाराचे नाव असलेल्या चिठ्ठ्या आढळून आल्या.
हवालदार काटवटे यांनी याबाबतची माहिती सहायक पोलिस निरीक्षक चौधरी यांना दिल्यानंतर अधिकाऱ्यांसह कर्मचारी त्या ठिकाणी दाखल झाले. त्यांनी आरोपींकडून दहा चिठ्ठ्या जप्त केल्या.
दरम्यान, उंडाळे येथेच दुसऱ्या मतदान केंद्रावर मंडल अधिकारी विलास थोरात हे ड्युटीवर असताना त्या ठिकाणीही संजय साहेबराव कोळी (रा. उंडाळे) हा उमेदवाराच्या प्रचारार्थ चिठ्ठ्या वाटत असल्याचे थोरात यांच्या निदर्शनास आले.
थोरात यांनी बीएलए टेबलावर जाऊन पाहिले असता त्या ठिकाणी उमेदवाराचा फोटो, नाव, चिन्ह आणि मतदारांची नावे असलेल्या चिठ्ठ्या दिसल्या. एकूण तेरा चिठ्ठ्या त्या ठिकाणी आढळून आल्या. मंडल अधिकारी थोरात यांनी त्या चिठ्ठ्या जप्त करून याबाबत कऱ्हाड ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. सहायक फौजदार राजेंद्र पाटोळे तपास करीत आहेत.