सातारा बाजार समितीसाठी सत्ताधाऱ्यांपुढे ‘स्वाभिमानी’चं आव्हान, १८ जागांसाठी ३७ जण रिंगणात
By नितीन काळेल | Published: April 20, 2023 06:44 PM2023-04-20T18:44:38+5:302023-04-20T19:04:00+5:30
सातारा बाजार समितीवर मागील ३० वर्षांपासून आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले गटाचे वर्चस्व
सातारा : सातारा शेती उत्पन्न बाजार समितीत एकही जागा बिनविरोध न होता आता थेट दुरंगी सामना होणार आहे. त्यामुळे यावेळी प्रथमच सत्ताधाऱ्यांपुढे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आव्हान उभे राहिले आहे. या निवडणुकीत १८ जागांसाठी ३७ जण रिंगणात राहिले आहेत.
सातारा बाजार समितीवर मागील ३० वर्षांपासून आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले गटाचे वर्चस्व आहे. यंदाही बाजार समितीवर झेंडा फडकविण्याचा आमदार गटाचा निर्धार आहे. तसेच बिनविरोध निवडणुकीकडे कल होता. पण, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने बळ निर्माण करुन या लढाईत उडी घेतली. गुरुवार उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे कोण माघार घेणार, निवडणूक बिनविरोध होणार का ? याकडे लक्ष लागले होते.
पण, ‘स्वाभिमानी’ने स्वाभिमानाने उभे राहत निवडणुकीचा शड्डू आणखी जोरदार केला. १८ जागेसाठी उमेदवार दिले. कोणीही माघार घेतलेली नाही. उलट स्वाभिमानी शेतकरी विकास आघाडी पॅनेलला नाव देऊन निवडणुकीत चूरस निर्माण करण्याचा विडाच उचलला आहे. त्यामुळे सत्ताधारी आमदार गटापुढे आव्हान उभे राहिले आहे.
बाजार समिती निवडणुकीतील कृषी पत व बहुउद्देशिय सहकारी संस्था मतदारसंघाततून ७ जणांना निवडूण द्यायचे आहे. यासाठी १५ जण रिंगणात असलेतरी खरा सामना हा सत्ताधारी आणि ‘स्वाभिमानी’तच होणार आहे. या मतदारसंघातून रमेश चव्हाण, दत्तात्रय जाधव, धनाजी जाधव, सुदाम जाधव, राहुल ढाणे, श्रीरंग देवरुखे, संजय नलवडे, राजेंद्र नलवडे, मधुकर पवार, विक्रम पवार, विजय पोतेकर, भिकू भोसले, दत्तात्रय मोरे, उत्तम शिर्के आणि अर्जून साळुंखे नशीब अजमावत आहेत. कृषी पतमधील महिला राखीवमधून दोन महिलांना निवडूण द्यायचे आहे. याठिकाणी वंदन कणसे, आशा गायकवाड, रत्नमाला जाधव आणि शाेभा भोसले यांच्यात दुरंगी लढत होणार आहे.
इतर मागास प्रवर्गासाठी एक जागा असलीतरी येथेही दुरंगी सामना होणार आहे. राजकुमार ठेंगे आणि इसूब पटेल हे दोघे रिंगणात आहेत. विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागासप्रवर्गसाठी एक उमेदवार निवडूण द्यायचा असून येथे दत्तात्रय कोकरे आणि नारायण शेडगे यांच्यात लढत होणार आहे.
ग्रामपंचायत मतदारसंघात सर्वसाधारणमधून दोघेजण नेतृत्व करणार आहेत. याठिकाणी आनंदराव कणसे, अरुण कापसे, विश्वजित लाड आणि सर्फराज शेख असे चाैघेजण रिंगणात आहेत. ग्रामपंचायत गटात अनूसुचित जाती जमातीसाठी एक जागा असलीतरी येथे शैलेंद्र आवळे आणि विशाल गायकवाड यांच्यात दुरंगी लढत होत आहे.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकमधून एकजण नेतृत्व करणार आहे. याठिकाणी शांताराम गोळे आणि संजय पवार यांच्यात सामना रंगणार आहे. त्याचबरोबर आडते-व्यापारी मतदारसंघातून दोघांना निवडूण द्यायचे आहे. याठिकाणी सरळ लढत असून अमीन कच्छी, तानाजी किर्दत, स्वप्नील धुमाळ आणि बाळासाहेब घोरपडे यांच्यात लढत होत आहे. तर हमाल, माथाडी मतदारसंघात एक जागा असून प्रकाश आटवे आणि अनिल जाधव यांच्यात लढत आहे.