खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष, उदयनराजे भोसले यांची टीका
By दीपक शिंदे | Published: April 26, 2024 01:46 PM2024-04-26T13:46:09+5:302024-04-26T13:47:29+5:30
सातारा : ढेबेवाडी काँग्रेसच्या नेत्यांनी निवडणुकांमध्ये जनतेला भरघोस आश्वासने देऊन खोऱ्याने मते मिळवली. परंतु पाटण खोऱ्यातील जनतेकडे साफ दुर्लक्ष ...
सातारा : ढेबेवाडी काँग्रेसच्या नेत्यांनी निवडणुकांमध्ये जनतेला भरघोस आश्वासने देऊन खोऱ्याने मते मिळवली. परंतु पाटण खोऱ्यातील जनतेकडे साफ दुर्लक्ष केले, अशी टीका महायुतीचे लोकसभा उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांनी केली.
ढेबेवाडी तालुका पाटण येथे आयोजित केलेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड. भरत पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रमेश पाटील, रणजित पाटील, डॉ. दिलीप चव्हाण, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष जयवंतराव शेलार, पंजाबराव देसाई, सीमा मोरे, कविता कचरे, गणेश यादव, राजेंद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.
खासदार उदयनराजे म्हणाले, कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना गोपीनाथ मुंडेंच्या काळात झाली. सध्या मराठवाडी धरण दिसते ते याच कृष्णा खोरे महामंडळाच्या माध्यमातून झालेले आहे. काँग्रेसच्या नेत्यांकडे अनेक वर्षे ही सत्ता होती, तर मग अशी कामे त्यांनी का मार्गी लावली नाहीत हा जाब जनतेने नेत्यांना विचारायला हवा.
पालकमंत्री शंभूराज देसाई म्हणाले, निष्ठावंत कार्यकर्ते पैशाला भुलत नाहीत. विरोधकांनी पोत्याने पैसा समोर टाकला तरी त्याला भुलणारी ही जनता नाही.