कोयना धरणाच्या पायथा वीजगृहातील कंडक्टर तुटला, प्रखर प्रकाशझोतामुळे घबराट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2022 04:10 PM2022-08-10T16:10:42+5:302022-08-10T16:11:10+5:30

आवाजाने परिसरातील ग्रामस्थ घराबाहेर धावले. त्यावेळी धरणाच्या दिशेला मोठ्या प्रमाणात प्रकाशाचे झोत निर्माण झाल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. किमान पाच मिनिटे हा प्रकाशझोत होता. या घटनेमुळे कोयनावासीयांमध्ये घबराट निर्माण झाली.

A conductor in the power house at the foot of the Koyna dam broke | कोयना धरणाच्या पायथा वीजगृहातील कंडक्टर तुटला, प्रखर प्रकाशझोतामुळे घबराट

संग्रहित फोटो

googlenewsNext

कोयनानगर : कोयना धरणाच्या पायथा वीजगृहातील स्वीचयार्डमध्ये २२० केव्हीच्या वनकुसावडे वाहिनीचा कंडक्टर अतिउच्च दाबामुळे तुटला. यावेळी मोठा आवाज होऊन सुमारे पाच मिनिटे प्रखर प्रकाशझोत बाहेर पडला. सोमवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास अचानक घडलेल्या या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

दरम्यान, वीजगृहातील बिघाडामुळे हा आवाज झाल्याचे तसेच प्रकाशझोत पडत असल्याचे समजल्यानंतर ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला. वीज प्रवाह स्पार्क होत असल्यामुळे सुमारे पाच मिनिटे डोळे दीपविणारा प्रकाशझोत ग्रामस्थांना पाहायला मिळाला.

याबाबत पायथा वीजगृहाच्या अभियंत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, महापारेषण कंपनीच्या पोफळी व वनकुसावडे दरम्यानच्या वीज वाहिन्या पायथा वीजगृहात आहेत. या वीजगृहातील स्वीचयार्डमध्ये असलेला बी फेजचा कंडक्टर सोमवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास तुटला. अचानक कंडक्टर तुटल्यामुळे मोठा आवाज झाला. या आवाजाने परिसरातील ग्रामस्थ घराबाहेर धावले. त्यावेळी धरणाच्या दिशेला मोठ्या प्रमाणात प्रकाशाचे झोत निर्माण झाल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. किमान पाच मिनिटे हा प्रकाशझोत होता. या घटनेमुळे कोयनावासीयांमध्ये घबराट निर्माण झाली.

मात्र, फेजचा कंडक्टर तुटल्यामुळे स्पार्क होऊन प्रकाशझोत निर्माण होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. या घटनेमुळे पायथा वीजगृहावर कोणताही परिणाम झाला नाही. बी फेजच्या कंडक्टर दुरुस्तीचे काम रात्रीच हाती घेण्यात येणार होते. मात्र, मोठ्या प्रमाणावर पाऊस असल्याने दुरूस्तीत अडथळे येत होते. तसेच वीजगृहावर त्याचा परिणाम होणार नसल्यामुळे मंगळवारी दिवसा दुरूस्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार मंगळवारी दुपारी आवश्यक ती दुरूस्ती करुन प्रवाह सुरळीत करण्यात आला.

Web Title: A conductor in the power house at the foot of the Koyna dam broke

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.