Satara News: थांबलेल्या कंटेनरला पाठीमागून जोराची धडक, पुण्याचा दुचाकीस्वार ठार; हेल्मेटची काच डोक्यात घुसली
By दत्ता यादव | Published: March 20, 2023 02:19 PM2023-03-20T14:19:25+5:302023-03-20T14:20:03+5:30
हा अपघात इतका भीषण होता की दुचाकीचे हँडल, चाक तुटले
सातारा : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर वेळे, ता. वाई गावच्या हद्दीत रस्त्याच्याकडेला थांबलेल्या कंटेनरला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने पुण्याच्या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. गिरीश कृष्णा नायडू (वय ४०, रा. सिटी लेन, खराडी पुणे) असे अपघातात ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. हा अपघात काल, रविवारी (दि. १९) झाला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गिरीश नायडू हे पुण्याहून पाचगणीला निघाले होते. त्यावेळी वेळे येथे रस्त्याच्याकडेला नादुरुस्त कंटेनर उभा होता. या कंटेनरला गिरीश नायडू यांच्या दुचाकीची जोरदार धडक बसली.
हा अपघात इतका भीषण होता की, नायडू यांच्या दुचाकीचे हँडल, चाक तुटले. अपघातावेळी त्यांच्या डोक्यात हेल्मेट होते. मात्र, याच हेल्मेटची काच डोक्यात घुसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर भुईंज पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन नायडू यांना दवाखान्यात नेले. मात्र, तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले.
या अपघाताची नोंद भुईंज पोलिस ठाण्यात झाली असून, हवालदार तोरडमल हे अधिक तपास करीत आहेत.