चौथ्या महिला धोरणाची प्रत शिवरायांच्या चरणी अर्पण!, किल्ले प्रतापगडावर अवतरला शिवकाळ
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2022 07:15 PM2022-02-19T19:15:12+5:302022-02-19T19:18:01+5:30
काठीवर चालणारी मुले, आई भवानीमातेचा व शिवरायांचा जयजयकार करणाऱ्या घोषणा यासह ढोल पथक, लेझीम यांच्या गजराने परिसर दुमदुमून गेला.
महाबळेश्वर : किल्ले प्रतापगड शिवजयंतीचे औचित्य साधून चौथ्या महिला धोरणाची प्रत छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी अर्पण करत अखंड हिंदुस्थानचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. जिल्हा परिषद सातारा यांच्या वतीने महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवजयंतीचे आयोजन केले होते.
सूर्योदयाच्या साक्षीने मंगलमय वातावरणात सुरुवात झालेल्या सोहळ्याने वातावरण भारून गेले होते. मंत्री यशोमती ठाकूर व जिल्हा परिषद अध्यक्षांच्या हस्ते भवानी मातेला महाअभिषेक तसेच यांच्या हस्ते भवानी मातेची मनोभावे महाआरती करण्यात आली. भवानी मातेच्या मंदिरासमोर ध्वजस्तंभाचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून भगव्या ध्वजाचे रोहण करण्यात आले. यावेळी ढोल पथक, लेझीम यांच्या गजराने परिसर दुमदुमून गेला.
प्रतापगड ग्रामस्थ व संयुक्त वनव्यवस्थापन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व शिवभक्तांना अल्पोपाहाराची व्यवस्था करण्यात आली होती. मानाच्या पालखीची पूजा झाल्यानंतर छत्रपतींची मूर्ती असलेल्या पालखीचे वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात आली. काठीवर चालणारी मुले, आई भवानीमातेचा व शिवरायांचा जयजयकार करणाऱ्या घोषणांनी मिरवणूक दुमदुमून गेली.
अश्वारूढ पुतळ्याजवळ शिवरायांच्या पालखीचे आगमन झाल्यावर मंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते पुष्पार्पण करून पूजन करण्यात आले. ‘क्षत्रिय कुलावंतस राजाधिराज...’या ललकारीने अन् शिवरायांच्या जयजयकाराने प्रतापगडावर शिवकाळ अवतरल्याची प्रचीती आली. शिवपुतळ्यावरील ध्वजस्तंभावर मान्यवरांच्या हस्ते भगव्याचे ध्वजारोहण करण्यात आले. हा नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी शिवभक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
बांबूच्या साह्याने सर केला किल्ले प्रतापगड
शिवरायांच्या अतुलनीय पराक्रमाचा साक्षीदार असणाऱ्या किल्ले प्रतापगडावर त्याच्याच पायथ्याला असणाऱ्या जावळी प्राथमिक शाळेच्या लहान मावळ्यांनी बांबूच्या साह्याने गड सर केला. दोन्ही पायांत काठी पकडून त्याच्या साह्याने जमिनीपासून सुमारे चार ते पाच फूट उंच असून त्यांनी नृत्य सादर केले. हे अनोखे चित्तथरारक नृत्य पाहताना मंत्री यशोमती ठाकूर यांनी आश्चर्य व्यक्त करत विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक केले.