Satara: पितृदोष काढण्याचे आमिष दाखवणाऱ्या भोंदू बाबावर गुन्हा, पोलिस-‘अंनिस’ची संयुक्त कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2023 11:42 AM2023-06-16T11:42:12+5:302023-06-16T11:42:38+5:30
घरातील भांडणे दैवी शक्तीने सोडवण्याचे आश्वासन देत पैसे उकळले
रहिमतपूर : घरावर पितृदोष असल्याचे सांगत दोष काढण्याचे आमिष दाखवून साडेतीन हजाराला ठगवणाऱ्या भोंदूबाबाला रहिमतपूर पोलिस आणि ‘अंनिस’ने सापळा रचून पकडले. याप्रकरणी जंगू अब्दुल मुलाणी (वय ७२, रा. अंभेरी, ता. कोरेगाव) याच्यावर गुन्हा नोंद झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, रहिमतपूर येथील सुभाषचंद्र आप्पासो मदने (वय ६७) यांच्या घरात गेली अनेक वर्षे कौटुंबिक वाद विवाद सुरू आहे. या त्रासातून मार्ग काढण्यासाठी कुणाकडून योग्य मार्गदर्शन मिळतोय का? यासाठी ते प्रयत्न करत होते. या दरम्यान त्यांना कुणीतरी अंभेरी येथील परिसरातील बाबा जंगू अब्दुल मुलाणी यांच्याकडे जाण्याचा सल्ला दिला. या बाबाची भेट घेतल्यानंतर त्याने सुभाषचंद्र मदने यांना त्यांच्या घरातील भांडणे दैवी शक्तीने सोडवण्याचे आश्वासन दिले.
यासाठी १० हजार खर्च होईल. मात्र, तुमची परिस्थिती पाहून ७ हजारांत काम करणार असल्याचे सांगितले. तसेच घरावर केलेली करणी व भानामती काढून पितृदोष दूर करण्यासाठी वाळू, पाणी व उडीद यांचे मिश्रण करून घराभोवती टाकण्यास सांगितले. घरातील जेवणामध्ये अंगाराही टाकण्यास दिला व लिंबाचा अंगारा लावून घरावरून उतरून टाकण्यास सांगितले. यासाठी सुभाषचंद्र मदने यांच्याकडून बाबाने वेळोवेळी साडे तीन हजार रुपये घेतले. मात्र, एवढे पैसे देऊन व सांगितलेले उपाय करूनही मदने यांना अपेक्षित फरक जाणवला नाही. त्यामुळे अंभेरीच्या बाबांनी आपली फसवणूक केल्याची जाणीव झाल्यानंतर मदने यांनी ‘अंनिस’कडे तक्रार केली होती.
रहिमतपूरचे सहायक पोलिस निरीक्षक गणेश कड यांनी जादूटोणा विरोधी कायद्यानुसार भोंदूबाबावर गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत पोलिस उपनिरीक्षक व्ही. आर. खुडे, हवालदार तुषार काळंगे यांच्यासह ‘अंनिस’चे कार्यकर्ते शंकर कणसे, डॉ. दीपक माने, भगवान रणदिवे, मधुकर माने, सीताराम चाळके, सीताराम माने, चंद्रहार माने आदी सहभागी झाले होते.
गॅरेजमध्ये पकडले...
जिल्हा पोलिस अधीक्षक समीर शेख आणि डॉ. हमीद दाभोलकर यांच्या मार्गदर्शनानुसार ही कारवाई करण्यात आली. यामध्ये रहिमतपूर व पिंपरी येथील ‘अंनिस’ कार्यकर्ते आणि रहिमतपूर पोलिसांनी सापळा रचून भोंदूबाबा जंगू मुलाणी याला बुधवारी सायंकाळी चारच्या सुमारास रहिमतपूर येथील वाठार रस्त्यालगत असलेल्या एका गॅरेजमध्ये रंगेहात पकडले. यामुळे एका भोंदूबाबाचा पर्दाफाश झाला.