'ग्रेड सेपरेटर'ला राजधानी लूक, ऐतिहासिक साताऱ्याची अनुभूती येणार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2022 05:53 PM2022-06-04T17:53:39+5:302022-06-04T17:54:08+5:30
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे कामही प्रगतीपथावर असून याठिकाणीही अत्यंत सुंदर सजावट आणि तटबंदी करण्यात येणार आहे.
दीपक शिंदे
सातारा : राजधानी सातारा म्हणून साताऱ्याची ओळख होत असताना आता ग्रेड सेपरेटरच्या आगमन आणि निर्गमन मार्गावर राजवाड्याच्या घुमटाकर प्रतिकृती बसविण्यात येणार आहेत. यामुळे ऐतिहासिक शहरात असल्याची अनुभूती सर्वांनाच येणार असून बाहेर गावाहून येणाऱ्या लोकांनाही साताऱ्यात आल्यानंतर ऐतिहासिक साताऱ्याची जाणीव या प्रतिकृतींवरून होणार आहे.
साताऱ्यातील ग्रेड सेपरेटरमुळे शहराचे वेगळेच दर्शन होते. ग्रेड सेपरेटरमधून अजूनही फारशी वाहतूक होत नसली तरी भविष्यातील वाहतुकीची समस्या सोडविण्याच्या दृष्टीने त्याचा महत्त्वाचा उपयोग होणार आहे. त्यामुळे राजवाड्याकडून बस स्टँण्डकडे जाताना आणि बस स्टँण्डकडून जिल्हाधिकारी कार्यालय तसेच कऱ्हाडकडे जाताना लागणाऱ्या ग्रेड सेपटेवर घुमटाकार कमानी बसविण्यात येणार आहेत. त्याची रेखाचित्रे तयार करण्यात आली असून काही दिवसातच याचे काम सुरू होणार आहे.
खासदार उदयनराजे भोसले यांनी यासाठी पुढाकार घेतला असून ही ठिकाणे सेल्फी पॉईंट म्हणूनही विकसित होणार आहेत. सेल्फीच्या माध्यमातून ती सर्वत्र पोहचतील आणि साताऱ्याची ऐतिहासिक सातारा म्हणून ओळख होण्यास महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडतील, असा विश्वास आहे.
सातारा नगरपालिकेच्यावतीने हे काम करण्यात येणार असून पुढील ३ ते ४ महिन्यात ते पूर्णत्वास जाणार आहेत. याबाबत कामाचे आदेश देण्यात आले असून हे काम लवकरच सुरू होणार आहे. ग्रेड सेपरेटरच्या सर्व कमानींवर या प्रतिकृती बसविण्यात येणार असून पोवईनाक्याचा परिसर आणखी दिमाखदार होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे कामही प्रगतीपथावर असून याठिकाणीही अत्यंत सुंदर सजावट आणि तटबंदी करण्यात येणार आहे. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची वाढविण्याचेही प्रस्तावित आहे.
सातारा शहराच्या वैभवात पडणार भर
सातारा शहराच्या वैभवात भर घालण्यासाठी सातारा पालिकेकडून विविध प्रकल्प राबविले जात आहेत. ग्रेड सेपरेटवर राजवाड्याच्या घुमटाकर प्रतिकृती हा त्याचाच एक भाग आहे. हे काम पूर्णत्वास आल्यानंतर पोवईनाकाच नव्हे तर सातारा शहराच्या सौंदर्यातही भर पडणार आहे.
ऐतिहासिक साताऱ्याचे वेगळेपण जपण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. नामवंत आर्किटेक्चरकडून याबाबतचे संकल्पाकृती तयार करण्यात आल्या असून हे काम लवकरच हाती घेतले जाणार आहे. त्यामुळे साताऱ्याच्या सौंदर्यात तर भर पडेलच. पण, शहराचे ऐतिहासिक महत्त्व आपल्याला टिकवून ठेवता येणार आहे. - अभिजीत बापट, प्रशासक, सातारा नगरपालिका