Satara: वर्ये रामनगर येथे प्लायवूड दरवाजा कंपनीला भीषण आग, कोट्यवधीचे नुकसान 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2023 03:29 PM2023-05-30T15:29:51+5:302023-05-30T15:30:47+5:30

सहा तासानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश

A fire broke out at a plywood door company at Varye Ramnagar in Satara | Satara: वर्ये रामनगर येथे प्लायवूड दरवाजा कंपनीला भीषण आग, कोट्यवधीचे नुकसान 

Satara: वर्ये रामनगर येथे प्लायवूड दरवाजा कंपनीला भीषण आग, कोट्यवधीचे नुकसान 

googlenewsNext

गुलाब पठाण

किडगाव : सातारा तालुक्यातील वर्ये रामनगर येथील ओसवाल डोअर नावाची कंपनी आहे. या कंपनीला मंगळवारी सकाळी अचानक आग लागली. यामुळे कोट्यवधी रुपयांचे दरवाजे व इतर साहित्य जळून खाक झाले. सहा तासांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.

रामनगर येथे ही कंपनी गेले कित्येक दिवसांपासून सुरू आहे. या ठिकाणी घराला लागणारे प्लायवूड दरवाजे बनवले जातात. या कंपनीचे मालक समोलचंद जमनालाल ओसवाल व सतीश ओसवाल हे आहेत. या ठिकाणी घरांना लागणारे दरवाजे बनवून विकले जातात. मंगळवारी सकाळी या कंपनीला आग लागली. त्यामुळे भले मोठे धुराचे लोट परिसरामध्ये दिसू लागले.

आगीची बातमी मिळताच सातारा नगरपालिकेचे दोन अग्निशामक बंब तसेच शेंद्रे येथील अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना, भुईंज येथील किसन वीर सातारा सहकारी साखर कारखाना व सातारा औद्योगिक वसाहतीतील कूपर कंपनीचे अग्निशामक बंब या ठिकाणी दाखल झाले. सुमारे पाच अग्निशामक बंब व दहा पाण्याच्या टँकरने ही आग सकाळी ८ वाजल्यापासून ते दुपारी दोन वाजेपर्यंत विझवण्याचे काम सुरू होते.

या कंपनीला लागलेल्या आगीमुळे कंपनी मालकाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. ही आग कशामुळे लागली हे मात्र अद्यापही समजू शकले नाहीत. अग्निशमन दल याचा शोध घेत आहेत. या कंपनीच्या शेजारी असणाऱ्या राहत्या घरालाही याची झळ पोचली असून, त्या घरातील संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे.

ही आग इतकी प्रचंड होती की आग चार तासांहून जास्त काळ धुमसत होती. आगीच्या ज्वालामुळे पत्रा व लोखंडी अँगल अक्षरशः वाकून गेले आहेत. आतमध्ये लाकडी साहित्य व रसायन असल्यामुळे आगीने रौद्ररूप धारण केले होते. पाण्याचा मारा केल्यामुळे आग आटोक्यात येत होती मात्र लाकडी साहित्य असल्याने ही आग दुमसत परत वाढत होती.

परिसरातील रामनगर, वर्ये पानमळेवाडी येथील नागरिकांनी आग विझवण्यासाठी मदत केली. सातारा तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी व पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. आग कशामुळे लागली हे मात्र अद्यापही स्पष्ट झाले नाही. कंपनीचे मालक ओसवाल हे हताशपणे आग विझवण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत होते.

Web Title: A fire broke out at a plywood door company at Varye Ramnagar in Satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.