Satara: तासवडे टोलनाक्यावर खासगी बसला लागली आग, बस जळून खाक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2023 01:48 PM2023-12-07T13:48:24+5:302023-12-07T13:49:20+5:30
अजय जाधव उंब्रज: पुणे - बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरून मुंबईकडे प्रवाशी घेऊन निघालेल्या खासगी बसला तासवडे टोलनाका येथे अचानक आग ...
अजय जाधव
उंब्रज: पुणे - बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरून मुंबईकडे प्रवाशी घेऊन निघालेल्या खासगी बसला तासवडे टोलनाका येथे अचानक आग लागली. या आगीत बस जळून खाक झाली. ही घटना तासवडे टोलनाक्यानजीक पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास घडली.
दरम्यान, या घटनेत बसमधून प्रवास करणारे ५५ प्रवाशांना तासवडे टोल व्यवस्थापन, महामार्ग पेट्रोलिंग कर्मचारी व तळबीड पोलिस ठाण्याचे कर्मचारी यांनी प्रसंगावधान दाखवत बस मधून बाहेर काढून वाचवले. या घटनेत बसचे अंदाजे २० लाख रुपयांचे नुकसान झाले तर प्रवाशांचे प्रवासी बँगेतील साहित्य जळून खाक झाले.
याबाबत मिळालेली माहिती अशी, डाँल्फीन कंपनीची खासगी प्रवासी वाहतूक बस (क्रमांक- एम.एच. ०३-सी.पी. ४५००) ही रात्री प्रवासी घेऊन मिरजहून मुंबईकडे निघाली होती. ही बस पुणे - बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरुन मुंबईकडे जात असताना पहाटेच्या सुमारास ही बस कराड तालुक्यातील तासवडे टोलनाक्यानजीक आल्यानंतर या बसला पाठीमागील बाजूस आग लागली. पाठीमागून येणाऱ्या दुसऱ्या बसच्या चालकाने आग लागल्याची माहिती चालकाला दिली. काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले.
दरम्यान, तासवडे टोल कर्मचारी, महामार्ग पेट्रोलिंग विभागाचे कर्मचारी व तळबीड पोलिस ठाण्याचे कर्मचारी यांनी तात्काळ प्रसंगावधान राखून गाडीतील प्रवाशांना खाली उतरले व नजीकच्या अग्निशामक दलाशी संपर्क साधला. त्यानंतर काहीवेळात कराड नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाच्या जवानानी घटनास्थळी पोहचून आग आटोक्यात आली. आगीत बसचे सुमारे वीस लाख रुपये तर प्रवाशांच्या साहित्याचे मोठे नुकसान झाले.