Satara: मैत्रिणीची मस्करी, बनावट खाते उघडून केले प्रेम; प्रियकराने जीव दिल्याचे भासविले, अन् विपरीत घडले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2024 06:21 PM2024-07-30T18:21:58+5:302024-07-30T18:22:35+5:30

पिंपोडे बुद्रुक : जीवलग मैत्रिणीने अनोळखी इन्स्टाग्राम अकाउंटवरून मुलाच्या नावाने चेष्टा मस्करी करीत प्रेमाचे नाटक केले. त्यानंतर आपली भांडाफोड ...

A friend lost her life due to a prank on social media in satara | Satara: मैत्रिणीची मस्करी, बनावट खाते उघडून केले प्रेम; प्रियकराने जीव दिल्याचे भासविले, अन् विपरीत घडले

संग्रहित छाया

पिंपोडे बुद्रुक : जीवलग मैत्रिणीने अनोळखी इन्स्टाग्राम अकाउंटवरून मुलाच्या नावाने चेष्टा मस्करी करीत प्रेमाचे नाटक केले. त्यानंतर आपली भांडाफोड होऊ नये म्हणून पहिल्या घटनेतील मुलाचे वडील असल्याचे भासवत दुसऱ्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पहिल्या प्रकरणातील मुलाचा मृत्यू झाल्याची मस्करी केली. तथापि, मृत मुलीने दु:ख वियोगातून आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे पोलिस तपासांत निष्पन्न झाले आहे. वाठार स्टेशन पोलिस ठाण्याच्या हद्दीत १२ जूनला घडलेल्या २४ वर्षीय मुलीच्या आत्महत्येच्या घटनेचे कारण शोधण्यात वाठार स्टेशन पोलिसांना यश आले असून, या प्रकारामुळे एका मुलीला जीव गमवावा लागला आहे.

याबाबत वाठार स्टेशन पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार वाठार पोलिस ठाणे हद्दीतील एका २४ वर्षीय अविवाहित मुलीने दि. १२ जूनला राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. ही आकस्मिक मृत्यूच्या कारणाबाबत मृत मुलगी हिचे मोबाईलची तपासणी केली असता त्यामध्ये इन्स्टाग्राम अकाउंटमध्ये मृत मुलीचे मनीष नावाचे मुलासोबत प्रेमसंबंध असल्याचे व त्यातील मनीष या मुलाने जीव दिला असल्याचे दिसून आले. तसेच शिवम पाटील याचे चॅटमध्ये मनीष याने जीव दिला असल्याचे दिसून आले. यावरून मृत मुलीने मनीष याच्या मृत्यूमुळे स्वत:चा जीव दिला असल्याचे चॅटवरून तपासांत आढळून आले. 

याबाबत मनीष व शिवम पाटील यांचे इन्स्टाग्राम खात्याचे सायबर पोलिस ठाणे सातारा व सायबर तज्ज्ञ जय गायकवाड यांच्या मदतीने इन्स्टाग्राम कंपनी यांचेकडून माहिती घेता मनीष व शिवम पाटील यांचे इन्स्टाग्राम खाते हे वाठार पोलिस ठाणे हद्दीतील एका मुलीने तयार केले असल्याचे आढळून आले. याबाबत मुलीकडे तपास करता ती मृत मुलगी हिची जीवलग मैत्रीण असल्याचे समजले. त्यामुळे त्या मुलीकडे तपास करता मृत मुलगी हिचे इन्स्टाग्राम खात्यावर आरोपी मुलगी हिने चेष्टा मस्करी करण्याच्या हेतूने मनीष या खोट्या नावाचे इन्स्टाग्राम खाते स्वत: तयार करून मैत्रिणीला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून दिली. मृत मुलगी हिच्यासोबत मनीष या नावाने स्वत:च चॅट करून मृत मैत्रिणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. 

मृत मैत्रीण ही मनीष याच्यावर प्रेम करू लागल्यामुळे व भेटण्याची व कॉल करण्याची इच्छा धरू लागल्याने आपले भांडे उघडे पडेल म्हणून आरोपी मुलीने शिवम पाटील नावाचे दुसरे खोटे इन्स्टाग्राम खाते तयार करून त्याचे मदतीने व मनीष याचे इन्स्टाग्राम खात्यावरून मनीषचा वडील बोलत असल्याचे दाखवून मनीष हा मृत झाला असल्याचे सांगितले. त्यामुळे त्याच्या मृत्यूच्या वियोगातून २४ वर्षीय अविवाहित मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे. मृत मुलगी हिने केलेल्या आत्महत्येस आरोपी मुलीने प्रवृत्त केले असल्याचे आढळून आल्याने संबंधित मुलीस अटक करण्यात आली असून, सध्या ती न्यायालयीन कोठडीत आहे.

अनोळखी सोशल खात्यापासून सावधान

फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉटसअप यासारख्या सोशल मीडिया वरील खात्यावर अनोळखी खाते यांची प्रत्यक्ष खात्री करून घ्यावी. अपरिचित खाते त्यांच्याशी संभाषण करू नये. आपली फसवणूक होऊ नये याची काळजी घ्यावी, असे आवाहन पोलिस दलाकडून करण्यात आले आहे.

Web Title: A friend lost her life due to a prank on social media in satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.