लेकीच्या लग्नात डीजेमुळे आई झाली कर्णबधिर, सातारा जिल्ह्यातील धक्कादायक घटना
By प्रगती पाटील | Published: August 22, 2024 11:47 AM2024-08-22T11:47:11+5:302024-08-22T11:47:41+5:30
शिराळा तालुक्यात नागपंचमीला आठ जण कर्णबधिर
प्रगती जाधव-पाटील
सातारा : गणपती मिरवणुकीत डीजेचा दणदणाट आणि त्यावर थिरकणाऱ्या तरुणाईला पाहणे आता नित्याचे झाले आहे. पण, डीजेतून बाहेर येणाऱ्या ध्वनीलहरी कानावर आदळून कर्णबधिरत्व येत असल्याची धक्कादायक उदाहरणे सातारा आणि सांगली जिल्ह्यांत घडली आहेत.
कोरेगाव तालुक्यातील एका गावात लेकीच्या लग्नात वाजणाऱ्या डीजेमुळे चक्क तिच्या आईला कर्णबधिरत्व आले आहे, तर सांगली जिल्ह्यात शिराळा तालुक्यात नागपंचमीच्या मिरवणुकीत तब्बल आठ युवकांनाही कर्णबधिरत्व आल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
मिरवणूक म्हटले की, ध्वनिक्षेपकाच्या भिंतींवर चढून नाचण्याची झिंग तरुणाई अनुभवते. मात्र, अनेकांना मिरवणुकीत डोके दुखणे, मळमळ, रक्तदाब वाढणे, चक्कर येणे यासह कर्णबधिरत्व होण्याच्या त्रासालाही सामोरे जावे लागते. आवाजाची सहनशक्तीच्या पलीकडे गेलेली पातळी हे या त्रासामागचे मुख्य कारण आहे. ध्वनिवर्धकांच्या भिंती उभ्या करून त्याच्यासमोर नाचणारे कार्यकर्तेही मिरवणुकीनंतर कानात दडे बसल्याचेच अनुभवत आहेत.
नागपंचमीतील अतिउत्साहाने कर्णबधिरत्व
सांगली जिल्ह्यातील बत्तीस शिराळा येथे नागपंचमीचा उत्सव जोरकसपणे साजरा केला जातो. राज्यभरातून नागपंचमीचा उत्सव पाहण्यासाठी भक्तांची गर्दी झालेली असते. यंदा एकाच गावात तब्बल ८० डीजे लावले हाेते. मद्याच्या धुंदीत असणाऱ्या तरुणाईने तेथे बेफाम नृत्य केले; पण मिरवणूक संपल्यानंतर यातील काही युवांना ‘रिंगिंग इअर’ अर्थात कानात आवाज येण्याचा त्रास जाणवू लागला. यातील काहींनी स्थानिक उपचार घेतले. पण आठ तरुणांना मात्र काहीच ऐकू येत नसल्याचे लक्षात आल्यानंतर कऱ्हाड येथील कृष्णा हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. या तरुणांचे पडदे शाबूत आहेत; मात्र डीजेच्या ध्वनीलहरींमुळे कानांच्या नसांना त्रास झाला असून ते पूर्णपणे कर्णबधिर झाले आहेत.
- माणूस सामान्य आवाजात बोलतो त्याची पातळी ४५ ते ६० डेसिबलपर्यंत
- वाहने किंवा काही यंत्रांचा आवाज हा ५५ ते ७० डेसिबलपर्यंत
- कारखान्यातील आवाज हा ८० ते १०० डेसिबल
- डॉल्बीचा आवाज ११० डेसिबल व अधिक
मोठ्या आवाजाच्या या समस्या
मोठ्या आवाजामुळे श्रवणशक्तीवर परिणाम किंवा ऐकण्याच्या समस्या आणि मानसिक किंवा इतर शारीरिक परिणाम असे दोन भाग आहेत. ऐकण्याच्या समस्यांचा विचार केला तर तात्पुरते कमी ऐकू येणे किंवा अगदी कायमचा बहिरेपणाही येऊ शकतो. मिरवणुकीमध्ये जाणवत नाही, मात्र त्यानंतर काही वेळाने ऐकू कमी येत असल्याचे किंवा दडे बसल्याचे जाणवते. हा परिणाम दोन-तीन दिवस राहू शकतो. त्यानंतर हळूहळू त्याचा परिणाम कमी होतो आणि ऐकू येऊ शकते. मात्र, काहीवेळा मोठ्या आवाजामुळे कानाचा पडदा, नसा यांवर गंभीर आघात होतात आणि परिणामी कायमचा बहिरेपणाही येऊ शकतो. रक्तदाब वाढणे, डोकेदुखी, छातीत धडधडणे असेही त्रास होतात.
प्रत्येकाच्या कानाची क्षमता भिन्न असते. डीजेच्या ध्वनीलहरी कानांच्या नसांवर परिणाम करत आहेत. त्यामुळे पडदा शाबूत असला तरीही अजिबात ऐकू न येणे हा त्रास रुग्णांना जाणवतो. मिरवणूक मार्गावरून गाडीतून जाणाऱ्या अवघ्या साडेपाच महिन्यांच्या लेकरालाही डीजेच्या आवाजाने बहिरेपण आले होते. वेळीच बाळावर उपचार झाल्याने त्याच्यावर उपचार करणे शक्य झाले. - डाॅ. संदीप आठवले, कान, नाक, घसा तज्ज्ञ