Satara: नायगावात १० एकरात क्रांतिज्योतींचे भव्य स्मारक उभारणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 12:51 IST2025-01-04T12:50:48+5:302025-01-04T12:51:36+5:30
पाच वर्षांत उभारणी; विधानसभेत ३३ टक्के महिला आमदार येणार

Satara: नायगावात १० एकरात क्रांतिज्योतींचे भव्य स्मारक उभारणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
खंडाळा : महात्मा फुले व सावित्रीबाई फुले हे युगप्रवर्तक आहेत. त्यांची जन्मभूमी असलेल्या नायगावच्या मातीतून वेगळी ऊर्जा मिळते. छगनराव भुजबळ यांच्यामुळे या भूमीच्या विकासाला प्रारंभ झाला. येथील उर्वरित विकास कामे केल्याशिवाय सरकार थांबणार नाही. दहा एकरांमध्ये सावित्रीमाईंचे भव्य स्मारक उभारून फुले दाम्पत्यांच्या समतेच्या विचाराच्या मार्गाने सरकार काम करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांनी दिली.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त खंडाळा तालुक्यातील नायगाव येथील शुक्रवारी सावित्रीमाई जयंती उत्सव उत्साहात पार पडला. यावेळी ते बोलत होते. यावेळी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, मंत्री अतुल सावे, शंभूराज देसाई, आदिती तटकरे, शिवेंद्रसिंहराजे भोसले, जयकुमार गोरे, मकरंद पाटील, माजी मंत्री छगन भुजबळ, आमदार अतुल भोसले, आमदार सचिन पाटील, आमदार मनोज घोरपडे, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलिस अधीक्षक समीर शेख, सरपंच स्वाती जमदाडे उपस्थित होत्या.
फडणवीस म्हणाले, तत्कालीन काळात समतेचे बिजारोपण झाले, यासाठी फुले यांनी काम केले. त्यांनी केलेले काम दिशादर्शक आहे. थोर माणसांचे काम कधीही संपत नाही. त्यांचे स्मारक विचारांचे व्हावे. राज्यात महिला लखपती योजना यशस्वी झाली. राज्यातील महिला स्वयंपूर्ण व्हाव्यात, यासाठी ही भूमी प्रेरणा देणारी आहे. आगामी पाच वर्षांमध्ये लोकसभा आणि विधानसभेत ३३ टक्के महिला सदस्या पाहायला मिळतील. त्यामुळे सावित्रीमाईंचे स्मारक करून दाखवू. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी दहा एकर जमिनीची अधिग्रहण प्रक्रिया सुरू करावी.
नायगाव गाव ग्रामविकास विभागाकडे दत्तक : गोरे
सावित्रीबाईंनी जगाला समतेचा विचार दिला. माता भगिनींना सन्मानाचे स्थान दिले. इथल्या मातीचा स्पर्श ऊर्जा देणारा आहे. या भूमीच्या विकासासाठी हे गाव ग्रामविकास विभागाकडून दत्तक घेऊन सर्वांगीण विकास केला जाईल, अशी ग्वाही मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.
फुले वाडा अन् अरणच्या भूमीचा आराखडा मंजूर व्हावा : भुजबळ
समाजाची सेवा हे व्रत फुले दाम्पत्यांनी जोपासले. शिक्षणाच्या प्रसारासह प्लेगच्या साथीत काम केले. त्यांच्या कार्याच्या स्मृती जतन करण्यासाठी नायगावसह पुणे येथील फुले वाडा व अरणच्या भूमीचा आराखडा मंजूर व्हावा. राष्ट्रीय संरक्षण अकॅडमीसाठी जागा उपलब्ध व्हावी. म्हणजे, ती महाज्योतीच्या वतीने उभारली जाईल, असे मत माजी उपमुख्यमंत्री छगनराव भुजबळ यांनी व्यक्त केले.