मॉलमध्येच अनावधानाने बंदुकीतून सुटली गोळी, एकजण जखमी; साताऱ्यातील घटना
By दत्ता यादव | Published: March 21, 2023 07:14 PM2023-03-21T19:14:09+5:302023-03-21T19:15:05+5:30
सुदैवाने कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही.
सातारा: सातारा तालुक्यातील शेंद्रे येथील एका मॉलमध्ये आलेल्या गिर्हाईकाच्या हातातील बंदुकीतून अनावधानाने गोळी सुटली. या घटनेत एका कामगाराच्या पायाला ही गोळी लागल्याने तो जखमी झाला. उलफिद युसुफ खान (रा. शेंद्रे) असे जखमी कामगाराचे नाव आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. सुदैवाने कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, शेंद्रे येथील एका मॉलमध्ये अहमदनगर मधील एक व्यक्ती आली होती. बंदुक ठेवण्याच्या पॉकेटच्या लेदरचे काम झाल्यानंतर तो उठून उभा राहत होता. यावेळी अचानकच बंदुकीतून गोळी सुटली. ही गोळी उलफिद खान याच्या पायाला लागल्याने तो जखमी झाला. जखमी उलफिद खान याला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. संबंधितांकडे बंदुकीचा परवाना असल्याची पोलिसांनी माहिती दिली आहे. परंतु संबंधित व्यक्ती मॉलमधून पसार झाली असल्याचे समोर आले आहे.
यानंतर सातारा तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तेथील सीसीटीव्ही तपासल्यानंतर संबंधित व्यक्तीच्या गाडीचा नंबर पोलिसांना दिसून आला. त्यावरून ती व्यक्ती अहमदनगरची असल्याचे समोर आले आहे. मात्र अद्याप त्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली नाही. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सातारा तालुका पोलीस ठाण्यात सुरु होती.