साताऱ्यातील येरवळेच्या जवानाचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू, आसाममध्ये सेवा बजावताना काळाचा घाला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2023 03:45 PM2023-06-21T15:45:19+5:302023-06-21T15:47:16+5:30
दोन वर्षांनी ते सैन्य दलातून सेवानिवृत्त होणार होते
कऱ्हाड : येरवळे, ता. कऱ्हाड येथील जवान सूरज मधुकर यादव (वय ३२) यांचा सैन्य दलात धीमापूर-आसाम या ठिकाणी सेवा बजावत असताना हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. सोमवारी सायंकाळी घडलेल्या घटनेची माहिती रात्री उशिरा गावाकडे समजल्याने गावातील वातावरण सुन्न झाले. त्यांचे पार्थिव विमानाने बुधवारी (दि. २१) पुण्यात येणार असून, त्यानंतर गावाकडे आणण्यात येणार असल्याचे नातेवाइकांनी सांगितले.
येरवळे येथील सूरज यादव हे २००७ मध्ये सैन्य दलात भरती झाले. काही वर्षे पुण्यात तर त्यानंतर उत्तर प्रदेशच्या बरेली भागात त्यांनी सेवा बजावली. दक्षिण आफ्रिकेला शांतिदूत म्हणूनही ते गेले होते. सध्या नागालँड-आसाम या ठिकाणी १११ इंजिनिअर रेजिमेंट विभागात धीमापूरमध्ये ते सेवा बजावत होते. त्याच ठिकाणी सोमवारी सायंकाळी हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचा मृत्यू झाला.
रात्री अकराच्या सुमारास याबाबतची माहिती सैन्य दलातून फोनद्वारे नातेवाइकांना देण्यात आली. या घटनेमुळे कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले. तसेच गावातील वातावरणही सुन्न झाले.
सूरज यांचे वडील मधुकर यादव हे सेवानिवृत्त सैनिक आहेत. सूरज हा त्यांचा एकुलता एक मुलगा होता. तीन महिन्यांपूर्वी गणेश जयंतीला सूरज हे गावी येरवळे येथे आले होते. तर दोन वर्षांनी ते सैन्य दलातून सेवानिवृत्त होणार होते.
मुलाच्या पहिल्या वाढदिवसाला येणार होते गावी
सूरज यादव यांचा २०१६ मध्ये विवाह झाला आहे. लग्नानंतर त्यांना ७ ते ८ वर्षांनी मुलगा झाला होता. त्या मुलाचा पुढील महिन्यात पहिला वाढदिवस साजरा करण्यासाठी सूरज गावी येणार होते. तत्पूर्वीच हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने अकरा महिन्यांच्या चिमुकल्या कृष्णावंशचे पितृछत्र हरपले आहे.