Satara Politics: 'कराड - पाटण'ला राज्यसभा देऊन समतोल साधा!, भाजप कार्यकर्त्यांचा सूर

By प्रमोद सुकरे | Published: July 8, 2024 12:37 PM2024-07-08T12:37:48+5:302024-07-08T12:39:54+5:30

म्हणे, हाती 'धुपाटणं' आल्याची भावना होईल दूर

A leadership from Karad-Patan should get a chance on the vacant Rajya Sabha seat, Demand from BJP workers | Satara Politics: 'कराड - पाटण'ला राज्यसभा देऊन समतोल साधा!, भाजप कार्यकर्त्यांचा सूर

Satara Politics: 'कराड - पाटण'ला राज्यसभा देऊन समतोल साधा!, भाजप कार्यकर्त्यांचा सूर

प्रमोद सुकरे

कऱ्हाड : नुकत्याच झालेल्या सातारा लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी प्रथमच राष्ट्रवादीच्या उमेवारावर मात करत 'कमळ' फुलवले. त्यांच्या या विजयात कराड पाटणची भूमिका महत्वपूर्ण ठरली असली तरी आपल्या हाती 'धुपाटणं' आल्याची भावना येथील मतदारांच्या मनात आहे. त्यामुळे राज्यसभेच्या रिक्त झालेल्या जागेवर 'कराड- पाटण'च्या एखाद्या नेतृत्वाला संधी मिळावी असा सूर आता या तीन मतदारसंघातील भाजपच्या कार्यकर्त्यांच्यातून व्यक्त होऊ लागला आहे.

सातारा लोकसभा मतदारसंघात कराड दक्षिण, कराड उत्तर आणि पाटण विधानसभा मतदारसंघात मिळून एकूण मतदानापैकी सुमारे ५५ टक्के मतदान आहे. त्यामुळे या मतदारसंघाचा खासदार ठरवताना या तिन्ही विधानसभा मतदारसंघाची भूमिका नेहमीच महत्वपूर्ण ठरली आहे. साहजिकच त्यामुळे अपवाद वगळता सातारा लोकसभा मतदारसंघावर 'कराड - पाटण'च्या उमेदवारांनीच नेतृत्व केले आहे.

यंदा मात्र राष्ट्रवादीतील अंतर्गत कुरघोड्यांमुळे 'कराड'ची उमेदवारी 'कोरेगाव'ला गेली. पण 'सातारा'चे 'उदयनराजे' खासदार झाले. खरंतर गत लोकसभा निवडणुकीत राजेंचा पराभव झाल्यानंतर पक्षाने त्यांचे पुनर्वसन म्हणून त्यांना राज्यसभेवर संधी दिली. त्यांचा कार्यकाल अजून बराच बाकी असताना पक्षाने त्यांना पुन्हा लोकसभेची उमेदवारी दिली.आता लोकसभेला ते विजय झाल्यामुळे त्यांची राज्यसभेची जागा रिक्त होणार आहे. या रिक्त झालेल्या जागेवर त्यांच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या कराड दक्षिण, कराड उत्तर किंवा पाटण विधानसभा मतदार संघातील एखाद्याला संधी मिळाली तर येथील जनतेच्या मनातील 'कराड- पाटण'ची खासदारकी गेली,हाती धुपाटणं आलं ही सल दूर होण्यास मदत होईल.शिवाय येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीतही पक्षाला त्याचा फायदा निश्चित होऊ शकेल अशी कार्यकर्त्यांची धारणा आहे.

पूर्वीही जिल्ह्यात असायचे दोन खासदार

पूर्वी सातारा जिल्ह्यात लोकसभेचे सातारा व कराड असे दोन मतदारसंघ होते.त्यामुळे जिल्ह्यात दोन खासदार राहिले.पैकी एक कराड - पाटणचा असायचा.पण मतदारसंघ पुनर्रचनेत कराड लोकसभा मतदारसंघ रद्द झाला आणि कराडचा समावेश सातारा मतदारसंघात झाला. तरी देखील अपवाद वगळता कराड - पाटणच्या नेतृत्वाने या मतदारसंघावर आपली पकड मजबूत ठेवली होती.

चित्र बदलले म्हणून ..

  • गत लोकसभा निवडणूकीत कराड दक्षिणमधून राष्ट्रवादीच्या उमेदवाराला सुमारे ३२ हजाराचे मताधिक्य होते. यावेळी मात्र येथे भाजपच्या उमेदवारांने ६१६ मतांची आघाडी घेतली आहे.
  • कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातून गत वेळी सुमारे ५० हजाराचे मताधिक्य राष्ट्रवादीच्या उमेदवाराला होते. यंदा ते केवळ १ हजार ७२४ वर आले आहे.
  • पाटण विधानसभा मतदारसंघात गतवेळी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला सुमारे २७ हजारावर मताधिक्य होते. यंदा मात्र ते २ हजार ९०० वर येवून ठेपले आहे.
  • थोडक्यात या तीन विधानसभा मतदारसंघातील मतांचे चित्र बदलल्यानेच उदयनराजेंचा विजय सुकर झाला आहे.


छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या लोकसभा निवडणूकितील विजयानंतर सातारा जिल्हा भाजपची एक बैठक योगेश टिळेकर यांच्या उपस्थितीत सातारला झाली. या बैठकीत उदयनराजेंच्या लोकसभा विजयामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर  जिल्ह्यातील कराड- पाटण तालुक्याला  संधी द्यावी असा ठराव एकमताने करण्यात आला आहे. -धैर्यशील कदम, जिल्हाध्यक्ष, भाजप (सातारा)

Web Title: A leadership from Karad-Patan should get a chance on the vacant Rajya Sabha seat, Demand from BJP workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.