बापरे... धावत्या दुचाकीवर बिबट्याने घेतली झेप!, दुचाकीस्वार गंभीर जखमी
By संजय पाटील | Published: November 5, 2022 11:59 AM2022-11-05T11:59:23+5:302022-11-05T11:59:57+5:30
बिबट्याने भीतीने घटनास्थळावरून धूम ठोकली
कऱ्हाड : तालुक्यातील तुळसण येथे काल, शुक्रवारी रात्री उशिरा धावत्या दुचाकीवर बिबट्याने झेप घेतली. त्यामुळे दुचाकीस्वार नाल्यात पडून गंभीर जखमी झाला. नागनाथ भोमाजी गंडे (रा. अहमदनगर) असे जखमी दुचाकीस्वाराचे नाव आहे. या घटनेनंतर बिबट्यानेही तेथून धूम ठोकली. दरम्यान, वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. परिसरातील ग्रामस्थांना त्यांनी सतर्कतेच्या सूचना दिल्या.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, तुळसण येथे नागनाथ गंडे हे ऊसतोड मजूर शुक्रवारी रात्री उशिरा दुचाकीवरून निघाले होते. यावेळी धावत्या दुचाकीवर अचानक बिबट्याने झेप घेतली. त्यामुळे नागनाथ गंडे यांचा दुचाकीवरील ताबा सुटून ते दुचाकीसह नाल्यात जाऊन कोसळले. बिबट्याही गाडीसोबत नाल्यात गेला. परंतु बिबट्याने भीतीने घटनास्थळावरून धूम ठोकली. या घटनेत नागनाथ गंडे यांच्या पायाला जखम झाली. त्यांनी आरडाओरडा केल्यामुळे परिसरातील ग्रामस्थांनी त्याठिकाणी धाव घेऊन त्यांना उपचारार्थ उंडाळेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.
वन अधिकारी तुषार नवले, कोळेचे वनपाल बाबुराव कदम, म्हासोली वनरक्षक सुभाष गुरव, कासारशिरंबे वनरक्षक सचिन खंडागळे, वनसेवक हणमंत कोळी, वैभव शेवाळे, तानाजी कोळी आदींनी जखमी ऊसतोड मजुराची विचारपूस केली. घटनास्थळाचीही पाहणी केली. तुळसण येथे असलेल्या ऊसतोड मजूराच्या कुटुंबाना काळजी घेण्याचे आवाहन केले. गावातील ग्रामस्थ व शेतकरी यांनीही बिबट्या असल्याने सावधानता बाळगावी, असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी तुषार नवले यांनी केले आहे