साताऱ्यात मास्कधारी हल्लेखोराचा व्यापाऱ्यावर खुनी हल्ला, कारण अस्पष्ट
By दत्ता यादव | Published: February 26, 2024 03:36 PM2024-02-26T15:36:58+5:302024-02-26T15:37:41+5:30
भिंतीवरून उडी मारून कोयत्याने वार
सातारा : येथील औद्योगिक वसाहतीमध्ये एका तरुण व्यापाऱ्यावर कोयत्याने खुनी हल्ला करण्यात आला असनू, यामध्ये संबंधित व्यापारी बालंबाल बचावले आहेत. ही धक्कादायक घटना दि. २४ रोजी रात्री साठेआठ वाजता घडली. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात अज्ञातावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, महेश शिवाजी सोनवणे (वय ३०, रा. ओम श्रीगणेश हाउसिंग सोसायटी, नवीन एमआयडीसी, सातारा) हे व्यापारी आहेत. शनिवार, दि. २४ रोजी रात्री साडेआठ वाजता त्यांच्या घरासमोर ते मित्रासोबत बोलत उभे राहिले होते. त्यावेळी एक व्यक्ती पाठीमागून संरक्षक भिंतीवरून उडी मारून आतमध्ये आला. त्या व्यक्तीने कोयत्याने पहिला वार सोनवणे यांच्या खांद्यावर केला. त्यानंतर दुसरा केला. परंतु सोनवणे यांनी तो वार चुकविला.
यानंतर संबंधित हल्लेखोर तेथून पसार झाला. जखमी सोनवणे यांना तातडीने साताऱ्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी त्यांचा जबाब घेतल्यानंतर सोमवारी रात्री पावणेएक वाजता गुन्हा दाखल केला. या हल्ल्यातून ते थोडक्यात बचावले आहेत. हा हल्ला कोणत्या कारणातून झाला, हे अद्याप समोर आले नसून, सहायक पोलिस निरीक्षक शितोळे हे अधिक तपास करीत आहेत.
हल्लेखोर सीसीटीव्हीत कैद ..
महेश सोनवणे यांची पुण्यात कंपनी आहे. मात्र, साताऱ्यात त्यांचे घर असल्याने ते पुण्यातून जाऊन-येऊन करतात. गेल्या काही दिवसांपासून संशयित हल्लेखोर तोंडाला मास्क लावून त्यांचा पाठलाग करत होता. मात्र, कोणीतरी असेल म्हणून त्यांनी दुर्लक्ष केले. ही घटना घडून गेल्यानंतर त्यांनी घराच्या परिसरातील सीसीटीव्ही पाहिले तेव्हा संबंधित हल्लेखोर मास्क लावून फिरत असताना दिसून आला. त्यांचा कोणाशीही वाद नाही. असे असताना संबंधित हल्लेखोर खुनाच्या उद्देशाने त्यांचा पाठलाग करत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. पोलिसांनी हल्लेखोराला तातडीने अटक करावी, अशी मागणी सोनवणे यांच्या कुटुंबाने पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्याकडे केली आहे.