लोकसभेसाठी महाविकास आघाडीने कंबर कसली, साताऱ्यात राष्ट्रवादी भवनात पार पडली बैठक
By दीपक देशमुख | Published: December 9, 2023 05:58 PM2023-12-09T17:58:52+5:302023-12-09T18:00:24+5:30
श्रमिकचे भारत पाटणकरांचीही उपस्थिती
सातारा : राज्यात महायुती आघाडीला टक्कर देण्यासाठी महाविकास आघाडीने कंबर कसली असून आगामी रणनिती ठरवण्यासाठी शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेस भवनात राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्यासह श्रमिक मुक्ती दलाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक येथे पार पडली. बैठकीत राज्यासह देशातील हुकूमशाही पद्धतीच्या सरकारविरोधात व्यापक जनआंदोलन उभे करण्याचा निर्णय घेण्यात आला. गाव आणि जिल्हापातळीवर बूथ रचना मजबूत करणे, कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी, जनसंपर्क वाढवणे यावर सविस्तर चर्चा करून निर्णय घेण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे व श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश जाधव, सचिव नरेंद्र देसाई, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख हर्षद कदम, सचिन मोहिते, प्रभाकर देशमुख, दीपक पवार, पारिजात दळवी, राष्ट्रवादीचे सरचिटणीस राजकुमार पाटील इत्यादी उपस्थित होते.
यानंतर माध्यमांशी बोलताना आ. शशिकांत शिंदे म्हणाले, राज्यांमध्ये अस्तित्वात असलेल्या महायुती सरकारकडून जनतेची कोट्यावधी रुपयाची निधी जाहीर करून प्रत्यक्षात मात्र फसवणूक केली जात आहे. सरकारच्या या दडपशाही विरोधात जनआंदाेलन उभारण्यात येईल. तत्पूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सूचनेनुसार गावपातळीवर व्यापक जनाधार निर्माण करणे कार्यकर्त्यांशी संवाद साधणे, त्यांचे संघटन निर्माण करणे, तालुका न्याय कार्यकर्त्यांचे मिळावे भरवणे, मिळाव्यामध्ये कार्यकर्त्यांना राजकीय दृष्ट्या प्रशिक्षित करणे इत्यादी कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आलेले आहे.
पुनर्वसन, सिचंनाच्या प्रश्नासाठीच राजकीय व्यासपीठावर : पाटणकर
धरणग्रस्तांचे नेते डॉ. भारत पाटणकर म्हणाले, पुनर्वसन आणि सिंचनाचे प्रश्न महाराष्ट्रात तसेच जिल्ह्यामध्ये गंभीर स्वरूपाचे आहेत. धरणग्रस्तांनी गेल्या वर्षभरात मोठ-मोठी जन आंदोलने केली. मात्र, राज्यातले सरकार आंदोलनकर्त्यांची हाक ऐकायला तयार नाही. अशा हुकूमशाही प्रवृत्तीच्या विरोधात एकत्र येऊन एक व्यापक जनचळवळ उभारण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतला आहे. या माध्यमातून शोषितांचे आणि वंचितांचे प्रश्न सुटणार असतील तर चळवळीचा भाग बनून शोषितांना न्याय देण्याचा आमचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.