भरधाव रिक्षास माकडाची धडक, रिक्षा पलटी होऊन चालकाचा मृत्यू; सातारा-मेढा रस्त्यावर झाला अपघात
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2023 05:10 PM2023-01-21T17:10:57+5:302023-01-21T17:11:20+5:30
सातारा तालुका पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद
सातारा : भरधाव वेगात असलेल्या रिक्षाच्या पुढील चाकाला माकड धडकल्याने रिक्षा पलटी झाली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या रिक्षा चालकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा अपघात सातारा - मेढा रस्त्यावर झाला.
संतोष नारायण जगताप (वय ४८, रा. ठोंबरेवाडी, ता. सातारा) असे ठार झालेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संतोष जगताप हे दि. १३ रोजी दुपारी दीड वाजता रिक्षा (एमएच ११ बीके ६३५३) चालवीत ठोंबरेवाडी येथून मेढ्याकडे जात होते. त्यावेळी कण्हेरजवळील नदीच्या अलीकडे अचानक त्यांच्या रिक्षासमोर माकड आले. हे माकड चाकाला धडकल्याने रिक्षा पलटी झाली.
यात जगताप यांच्या डोक्याला, हाताला, पायाला, बरगड्यांना व मणक्याला गंभीर मार लागला. त्यांना तातडीने साताऱ्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, शुक्रवार, दि. २० रोजी सायंकाळी पाच वाजता त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सातारा तालुका पोलिस ठाण्यात या अपघाताची नोंद झाली असून, महिला पोलिस उपनिरीक्षक जाधव या अधिक तपास करीत आहेत.