सातारा जिल्ह्यात पश्चिमेकडे धबधब्यांची पर्वणी; ठोसेघर, एकीव, दुंद, भांबवली धबधबे कोसळताहेत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2024 01:39 PM2024-07-01T13:39:48+5:302024-07-01T13:40:14+5:30

पेट्री : पश्चिम घाटात अधूनमधून मुसळधार पाऊस चांगलाच रमला असून, दिवसभर धुक्याची दुलई पसरलेली दिसत आहे. दाट धुके अन् ...

A mountain range of waterfalls to the west in Satara district; Toseghar, Ekiw, Dund, Bhambvali waterfalls are falling | सातारा जिल्ह्यात पश्चिमेकडे धबधब्यांची पर्वणी; ठोसेघर, एकीव, दुंद, भांबवली धबधबे कोसळताहेत

सातारा जिल्ह्यात पश्चिमेकडे धबधब्यांची पर्वणी; ठोसेघर, एकीव, दुंद, भांबवली धबधबे कोसळताहेत

पेट्री : पश्चिम घाटात अधूनमधून मुसळधार पाऊस चांगलाच रमला असून, दिवसभर धुक्याची दुलई पसरलेली दिसत आहे. दाट धुके अन् त्यात हरवलेल्या निसर्गरम्य डोंगरातून धबधबे कोसळत आहेत. ठोसेघर तसेच एकीव, भांबवलीपर्यंत असंख्य लहान-मोठे धबधबे मोठ्या प्रमाणावर कोसळत आहेत.

सातारा-बामणोली मार्गावर आंतरराष्ट्रीय जैवविविधता असणाऱ्या कास पठार परिसरात सध्या अधूनमधून मुसळधार पाऊस होऊन सध्या पावसाची रिमझिम सुरू आहे. तसेच बऱ्याचदा जोरदार पावसाच्या सरी पडत असल्याने छोटे-मोठे धबधबे फेसाळत आहेत.

शहराच्या पश्चिमेस एकीव, दुंद, कास पठार परिसर, भांबवली येथील कित्येक धबधबे फेसाळू लागले आहेत. या धबधब्यांसमवेत अनेक पर्यटक पावसात भिजत फोटोसेशन करत आहेत. दरम्यान, जिल्ह्यात यंदा मान्सूनने वेळेपूर्वी हजेरी लावली असली, तरी सध्या कास परिसरात अधूनमधून मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत आहे. कास पठारावर कास तलावाकडे जात असताना असलेल्या वळणावर छोट्या प्रमाणात धबधबा कोसळू लागला आहे. छोटे-मोठे कोसळणारे धबधबे, चोहोबाजूला हिरवीगार दाट झाडी, पावसाच्या अधूनमधून कोसळणाऱ्या सरी, वेगाने वाहणारा वारा, त्यात सर्वत्र पसरलेले धुके डोळ्यांचे पारणे फेडत आहेत.

कण्हेर धरणाच्या पाणीपातळीत वाढ..

मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असल्याने कास पठाराच्या सड्यावरून पाणी वाहू लागल्याने तलावाकडे जाणाऱ्या पठारालगत असणारा छोटा धबधबा तसेच सड्यावरून पूर्वेला वाहणाऱ्या पाण्यामुळे पारंबे फाट्यापासून उजवीकडे चार किलोमीटर अंतरावरील एकीव धबधबा कोसळत आहे. यामुळे कण्हेर धरणाच्या पाणीपातळीत वाढ होत आहे.

भांबवलीसह कास पठार परिसरात अनेक छोटे-मोठे धबधबे दर्शन देऊ लागले आहेत. येथील दाट धुक्यात रिमझिम पडणारा पाऊस मन हेलावून टाकत आहे. - राजेंद्र मोहिते, पर्यटक, पुणे

Web Title: A mountain range of waterfalls to the west in Satara district; Toseghar, Ekiw, Dund, Bhambvali waterfalls are falling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.