कोट्यवधीचे पूल झाले; पण ‘उजेड’ पडेना!, कृष्णा पुलावरील वाहतूक धोकादायक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2022 02:31 PM2022-09-26T14:31:07+5:302022-09-26T14:31:39+5:30

पुलाच्या फुटपाथवरून या अंधारात वाट काढणेही जिकीरीचे

A multi-crore bridge was constructed over the Krishna River here on the Karad Vita route; But there are no street lights | कोट्यवधीचे पूल झाले; पण ‘उजेड’ पडेना!, कृष्णा पुलावरील वाहतूक धोकादायक

कोट्यवधीचे पूल झाले; पण ‘उजेड’ पडेना!, कृष्णा पुलावरील वाहतूक धोकादायक

googlenewsNext

कऱ्हाड : कऱ्हाड-विटा मार्गावर येथील कृष्णा नदीवर कोट्यवधीचा पूल उभारला गेला; पण या पुलावर एकही पथदिवा लावला गेला नाही. त्यामुळे रात्रीच्या अंधारात या पुलावर काळोख पसरलेला असतो. पुलाच्या फुटपाथवरून या अंधारात वाट काढणेही जिकीरीचे बनते. संबंधित विभागाने पुलावरील अंधार दूर करण्यासाठी पथदिवे लावण्याची गरज आहे.

कऱ्हाडकडून सैदापूर ओगलेवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर दोन पूल आहेत. या पुलांवरून एकेरी वाहतूक सुरू झाल्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न मिटला आहे. कृष्णा नदीवर यापूर्वी कमी उंचीचा पूल होता. मात्र पावसाळ्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली की, बहुतांश वेळा तो पूल दोन-तीन दिवस पाण्याखाली असायचा. २०१९ साली नवीन पुलाचे बांधकाम सुरू झाले. त्यावेळी जुना कृष्णा पूल अस्तित्वात होता. मात्र, त्यावर्षी आलेल्या महापुरात जीर्ण झालेला तो पूल कोसळला. त्यामुळे तेथील वाहतूक शेजारीच उभारलेल्या नव्या पुलावरून सुरू झाली. दुहेरी वाहतुकीचा ताण त्या पुलावर होता. पुलावरील वाहतूक कोंडी लक्षात घेत नवीन पुलाचे काम गतीने पूर्ण करून नवीन कृष्णा पूल ३० मे रोजी वाहतुकीस खुला करण्यात आला.

सध्या दोन्ही नवीन पुलावरून एकेरी वाहतूक होत असल्याने वाहतूक कोंडीतून वाहनधारकांची सुटका झाली आहे. पादचाऱ्यांपासून ते अवजड वाहनांपर्यंत सर्वजण या दोन्ही नवीन कृष्णा पुलावरून ये-जा करू लागलेत. मात्र,अजूनही या पुलांवर पथदिवे लावले गेलेले नाहीत. त्यामुळे पुलावरून रात्री प्रवास करताना वाहनधारकांना कसरत करावी लागते. दिवसा वाहनधारकांना येथे सतर्कता बाळगावी लागत नसली तरी,रात्रीच्यावेळी मात्र या पूल परिसरात अपघाताची शक्यता निर्माण होते.

पादचाऱ्यांचा जीव मुठीत

नवीन कृष्णा पुलांच्या दोन्ही बाजूला पादचारी मार्ग काढण्यात आले आहेत. महाविद्यालयीन विद्यार्थी, युवती तसेच परिसरातील नागरिक या पादचारी पुलांचा वापर करतात. मात्र,रात्रीच्यावेळी या पादचारी मार्गावरून पायी चालत जाणे धोक्याचे बनत आहे. एका बाजुला नदी तर दुसऱ्या बाजूला रस्ता अशा परिस्थितीत अंधारातून पादचाऱ्यांना मार्गक्रमण करावे लागत आहे.

Web Title: A multi-crore bridge was constructed over the Krishna River here on the Karad Vita route; But there are no street lights

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.