सातारा: अर्धवट जळालेले अर्भक आढळले, फलटण तालुक्यात उडाली खळबळ
By दीपक शिंदे | Published: September 8, 2022 03:26 PM2022-09-08T15:26:54+5:302022-09-08T15:27:27+5:30
शेताकडे निघालेल्या एका व्यक्तीस ही घटना निदर्शनास आली
कोळकी - फलटण तालुक्यातील सोनवडी बुद्रुक येथील लळेईची वगळीमध्ये पुरुष जातीचे अर्भक अर्धवट जळालेल्या स्थितीत आढळून आले. शेताकडे निघालेल्या एका व्यक्तीस ही घटना निदर्शनास आली. याघटनेनंतर तालुक्यात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.
याबाबत घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी की, सोनवडी बुद्रुक गावामध्ये लळेईची वगळीस लागून असलेल्या मोकळ्या जागेत बाभळीचे तोडलेल्या काट्यात पुरुष जातीचे अर्भक जळालेल्या स्थितीत आढळले. अज्ञाताने काल राञीच्या सुमारास या अर्भकास जाळल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. राञीच्या सुमारास आलेल्या पावसामुळे ते अर्भक अर्धवट जळाले असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
देवा मोरे हे आपल्या शेतात जात असताना आज, गुरुवारी सकाळच्या सुमारास त्यांना ही घटना निदर्शनास आली. त्यानंतर मोरे यांनी गावचे पोलीस पाटील अनिल सुर्यवंशी यांनी माहिती दिली. सुर्यवंशी यांनी प्रत्यक्ष पाहणी करुन फलटण ग्रामीण पोलिसांना याबाबत माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच फलटणचे उपविभागीय पोलिस अधिक्षक तानाजी बरडे, ग्रामीणचे पोलिस निरीक्षक धन्यकुमार गोडसे, एपीआय अक्षय सोनवणे यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. यानंतर अर्धवट जळालेले अर्भक ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले. याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहे.