पानेरीत गव्यांच्या हल्यात एकजण जखमी; वाल्मीक पठारावरील घटना
By दीपक शिंदे | Published: December 23, 2023 02:32 PM2023-12-23T14:32:48+5:302023-12-23T14:32:57+5:30
कऱ्हाड येथील कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू
सणबूर : वाल्मीक पठारावरील पानेरी, ता. पाटण येथील बाबू हरिबा झोरे (वय ३२) यांच्यावर शुक्रवारी सायंकाळी ८:३० च्या सुमारास चार गव्यांनी हल्ला करून जखमी केल्याची घटना घडली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, बाबू झोरे हे शनिवारी सायंकाळी आईला मुंबईला सोडण्यासाठी ढेबेवाडी येथून परत घरी जात असताना पानेरी गावच्या शिवजवळ डोंगराच्या दिशेने चार गवे पळत आले आणि त्यातील दोन गव्यांनी गाडीवर जोराची धडक दिली. त्यामुळे झोरे हे गाडीवरून खाली पडले. त्यानंतर गव्यांनी त्यांच्यावर पुन्हा हल्ला करून गंभीर जखमी केले.
जखमी अवस्थेतही झोरे यांनी आरडाओरडा केल्याने शेजारी असलेल्या वन्यजीवचे कर्मचारी व गावकऱ्यांनी तत्काळ त्यांना ढेबेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी घेऊन गेले. झोरे यांना ग्रामीण रुग्णालयात आणल्यावर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता, झोरे यांची जीभ तुटलेली होती, यांच्या डोक्याला मार लागला होता. अंगावर अनेक जखमा झालेल्या होत्या, अशा अवस्थेत त्यांच्यावर उपचार करून कऱ्हाड येथील कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आले.