Satara: कोल्हापूरला निघालेली खासगी बस उलटली; १२ प्रवासी जखमी, वाहतूक विस्कळीत
By संजय पाटील | Published: March 27, 2024 12:38 PM2024-03-27T12:38:33+5:302024-03-27T12:39:00+5:30
अपघातानंतर सुमारे पाऊण तास वाहतूक विस्कळीत
कऱ्हाड : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर वराडे, ता. कऱ्हाड येथे मोहिते वस्तीसमोर खासगी बस उलटली. या अपघातात खासगी बसमधील १२ प्रवासी जखमी झाले आहेत. बोरवलीवरून कोल्हापूरला ही ट्रॅव्हल्स निघाली होती. आज, बुधवारी सकाळच्या सुमारास वराडे गावच्या हद्दीत चालकाचे नियंत्रण सुटल्याने वळणावर ट्रॅव्हल्स पलटी झाली.
बोरिवलीहून कोल्हापूरकडे निघालेली खासगी ट्रॅव्हल्स बुधवारी सकाळी वराडे गावच्या हद्दीत तासवडे टोलनाक्यापासून काही अंतरावर असलेल्या मोहिते वस्तीनजीक आली. त्यावेळी चालकाचा ताबा सुटल्याने खासगी बस महामार्गनजीक पलटी झाली. या खासगी बसमधून सुमारे २८ जण प्रवास करत होते. यातील बारा प्रवासी जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी उंब्रज येथे खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर सुमारे पाऊण तास वाहतूक खोळंबा होवून सुमारे दोन किलोमीटरवर वाहनांच्या रांगा लागल्या.
दरम्यान क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त ट्रॅव्हल रस्त्यातून बाजूला करण्यात आली. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. घटनास्थळी तळबीड पोलीस दाखल झाले असून त्यांनी अपघाताचा पंचनामा केला आहे.