फोटो डिलीट करण्यासाठी तरुणीकडे मागितली लाखाची खंडणी; साताऱ्यातील घटना
By दत्ता यादव | Published: August 23, 2023 08:05 PM2023-08-23T20:05:00+5:302023-08-23T20:05:16+5:30
महाविद्यालयीन तरुणीची पोलिस ठाण्यात धाव
सातारा : वर्गमित्राने घरात येऊन काही फोटो काढले. हे फोटो डिलीट करण्यासाठी वर्गमित्राने तिला ब्लॅकमेल करून तिच्याकडे एक लाखाची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार साताऱ्यात घडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिच्या वर्गमित्रावर खंडणीसह विनयभंगचा गुन्हा दाखल केला.
संग्राम संजय चव्हाण (वय २५, रा. एकंबे, ता. कोरेगाव, जि. सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पीडित तरुणी २३ वर्षांची असून, संग्राम आणि ती एकाच वर्गात शहरातील एका महाविद्यालयात शिकत आहेत. एके दिवशी तरुणीच्या घरी येऊन लग्नाचे आमिष दाखवून त्याने तरुणीचे काही फोटो काढले. त्यानंतर तिला तो ब्लॅकमेल करू लागला.
एवढ्यावरच न थांबता त्याने फेक आयडीवरून मेसेज करून फोटो व व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊ लागला. फोटो डिलीट करण्याच्या बदल्यात एक लाख रुपये रक्कम व माझ्यासोबत एक रात्र ये, अशी मागणी करू लागला. अखेर हा प्रकार असाह्य झाल्याने तरुणीने सातारा शहर पोलिस ठाण्यात दि. २२ रोजी रात्री धाव घेऊन तक्रार दाखल केली.