हॉटेलचालकाकडे मागितली दहा हजारांची खंडणी, चौघांवर गुन्हा दाखल
By दत्ता यादव | Published: June 10, 2023 06:21 PM2023-06-10T18:21:38+5:302023-06-10T18:21:56+5:30
'पैसे दिले नाही तर बार चालू देणार नाही'
सातारा : ‘तुला बार चालवायचा असेल तर महिन्याला १० हजार रुपये दे’ अशी खंडणी मागून जबरदस्तीने गल्ल्यातील ९५० रुपये चोरून नेले. ही घटना दि. ८ रोजी रात्री ८:३० च्या सुमारास घडली. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
निखिल पाटणकर, योगेश जाधव, गणेश ननावरे व एक अनोळख्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. अनिल परशुराम मोरे (वय ४७, रा. बलेवाडी, पो. नुने, ता. सातारा) यांनी फिर्याद दिली.
फिर्यादीचे संगम नावाचे हॉटेल आहे. संशयित चौघांनी हॉटेलमध्ये येऊन काउंटरवरील दारूच्या काचेच्या बाटल्या व टेबलवरील पाण्याचे जार फोडून नुकसान केले. ‘तुला बार चालवायचा असेल तर महिन्याला १० हजार रुपये द्यावे लागतील, पैसे दिले नाही तर बार चालू देणार नाही,’ अशी धमकी देऊन खंडणी मागितली. तसेच भागमल विजय यांच्या आइस्क्रीमचे नुकसान केले आणि गल्ल्यातील ९५० रुपये जबरदस्तीने काढून घेतले. या घटनेचा तपास पोलिस नाईक भिसे हे करत आहेत.