कोयनेच्या आपात्कालीन झडपेतून बाहेर पडणाऱ्या पाण्याचा जलाशय, वीजगृहाला धोका नाही!
By दीपक शिंदे | Published: November 8, 2022 08:30 PM2022-11-08T20:30:03+5:302022-11-08T20:30:14+5:30
कोयना जलविद्युत टप्पा: सर्ज विहिरीची लवकरच दुरुस्ती करण्याची आवश्यकता
दीपक शिंदे, लोकमत न्यूज नेटवर्क, सातारा: कोयना जलविद्युत टप्पा क्र. १ व २ च्या आपत्कालीन झडप भुयार येथील भिंतीमधून व छतामधून पाण्याची गळती होत आहे. मात्र, यामुळे घाबरून न जाता ही गळती बोगद्याच्या सर्ज वेलला तडे गेल्यामुळे होत असून त्यामुळे घाबरून जाऊ नये. यामुळे धरणाच्या जलाशय, वीजगृह किंवा डोंगराला कोणताही धोका नसल्याची माहिती जलसंपदा विभागाचे निवृत्त सचिव दीपक मोडक यांनी दिली आहे.
मोडक यांनी याबाबत माहिती देताना म्हटले आहे की, कोयना प्रकल्पाच्या पहिल्या व दुसऱ्या टप्प्याकरिता विद्युत निर्मितीसाठी जे पाणी नवजा टॉवरमधून अधिजल भुयार किंवा हेड रेस टनेलमार्गे निघते त्या बोगद्याच्या शेवटी एक उल्लोळ विहीर किंवा सर्ज वेल बांधलेली आहे. या विहिरीपासून पुढे दाब बोगद्यातून पाणी वीजगृहाकडे जातं. ही सर्ज वेल १९६० साली बांधून पूर्ण झाली असून ती कातळात १०० मीटर खोल आणि २२ ते २५ मीटर व्यास असलेली आहे. त्याला अर्ध्या मीटर रुंदीचं काँक्रीट अस्तरीकरण केलेलं आहे. ही विहीर गेली साठ वर्षं तिथे असून तिने अनेक भूकंपाचे धक्के पचवलेले आहेत. मात्र, आता काही ठिकाणी अस्तरीकरणाला तडे गेल्यामुळे सर्ज वेल मधून हे झिरपलेलं पाणी इमर्जन्सी व्हॉल्व्ह टनेल किंवा आपत्कालीन झडपद्वारे भुयारामध्ये जातं आणि तिथून ते वाहत डोंगराच्या उतारावरून बाहेर पडतं.
या पाण्याचा वीजगृहाला, जलाशयाला किंवा डोंगराला कोणताही धोका नाही. दुरुस्तीसाठी वीजनिर्मिती बंद ठेवावी लागेल. सद्यस्थितीमध्ये ही गळतीचे अण्वेषण झालेले असून यासाठी गळती बंद करण्याची उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. सध्या पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने त्याठिकाणी जाऊन दुरुस्ती करता येणार नाही. मात्र, उन्हाळ्यात महाजनको आणि जलसंपदा विभागाने ही दुरुस्ती करण्याची आवश्यकताही त्यांनी व्यक्त केली आहे.
डोंगरातून ३ घनफूट प्रति सेकंद वाहते पाणी- सर्ज वेलला तडे गेल्याने त्यातून झिरपलेले पाणी हे डोंगरातून बाहेर पडत आहे. हे पाणी ३ घनफूट प्रति सेकंद वेगाने बाहेर पडत असून त्यामुळे घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. ही गळती ६० वर्षांनंतर समोर आली आहे. त्यामुळे ती दुरुस्त करण्यात आल्यानंतर पाणी बंद होईल, असा विश्वासही मोडक यांनी व्यक्त केला आहे.