साताऱ्यात तोतया पोलिसांनी निवृत्त तहसीलदाराला गंडवले, साडेचार लाखांचे दागिने हातोहात लांबवले
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2023 06:34 PM2023-01-11T18:34:10+5:302023-01-11T18:34:32+5:30
हिप्नॉटिझम तर नाही ना...?
सातारा : ‘मी क्राइम ब्रँचचा पोलिस असून येथे चोऱ्या हात आहेत, तुमचे दागिने काढून द्या,’ असे म्हणून तोतया क्राइम ब्रँचच्या पोलिसाने चक्क निवृत्त तहसीलदाराला तब्बल साडेचार लाखांना गंडा घातला. ही धक्कादायक घटना गोडोली परिसरात रविवारी सायंकाळी साडेसहा वाजता घडली.
शंकरराव तुकाराम मुसळे (वय ८२, रा. साईकृपा गिरिचिंतन काॅलनी, विलासपूर, गोडोली, सातारा) हे सेवानिवृत्त तहसीलदार असून, रविवार, दि. ८ रोजी सायंकाळी ते चालत निघाले होते. गोडोलीतील हाॅटेल समुद्रसमोरील रस्त्यावर आल्यानंतर तेथे दोन युवक आले. त्यापैकी एका तरुणाने ‘मी क्राइम ब्रँचचा पोलिस असून येथे चोऱ्या होत आहेत. तुमचे दागिने काढून द्या,’ असे सांगितले, तर दुसऱ्या तरुणाने हातचलाखी करून मुसळे यांच्या गळ्यातील सोन्याची चेन आणि अंगठ्या स्वत: काढून घेतल्या.
हे सर्व दागिने रुमालात बांधून देतो, असे म्हणून त्या तरुणाने रुमालात पेपर व टिश्शूपेपरमध्ये गुंडाळून त्यांच्या हातात दिला. यानंतर दोघेही चोरटे तेथून दुचाकीवरून पसार झाले. काही अंतर पुढे गेल्यानंतर मुसळे यांनी रुमाल उघडून पाहिला असता त्यामध्ये दगड आढळून आला.
आपली फसवणूक झाल्याचे समजताच मुसळे यांनी हा प्रकार घरातल्यांना सांगितला. दुसऱ्या दिवशी सोमवारी सायंकाळी त्यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली. या दोघा चोरट्यांनी तब्बल ४ लाख २० हजार १७० रुपयांचे दागिने हातोहात लांबविल्याचे समोर आले आहे.
हिप्नॉटिझम तर नाही ना...?
सेवानिवृत्त तहसीलदार मुसळे यांना चोरटे काय बोलताहेत, हे समजत होते. मात्र, त्यांच्या वार्धक्याचा गैरफायदा घेऊन चोरट्यांनी त्यांचे दागिने स्वत:हून काढून घेतले. मुसळे यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी हिप्नाॅटिझम केले असावे. त्यामुळेच त्यांना दागिने चोरता आले.