राजेशाही स्वागत; परफ्युम गिफ्ट अन् दिर्घायुष्याचे शुभाशिर्वाद!
By दीपक देशमुख | Published: January 29, 2023 04:24 PM2023-01-29T16:24:50+5:302023-01-29T16:25:43+5:30
सातारा येथे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्यास अभिवादन करून ते दौऱ्याला सुरुवात करणार आहेत.
सातारा : मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी रविवारी साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसले यांची जलमंदिर येथे भेट घेतली. खासदार उदयनराजे भोसले यांनी त्यांचे राजेशाही स्वागत करत दिर्घायुष्य लाभो, असा शुभाशिर्वाद दिला. बलगारी मॅन परफ्यूम देत आता ते लहान मुलगा राहिले नसून मोठा माणूस झाले असून सर्वांची काळजी घेतील, असेही मिष्किलपणे उदयनराजे म्हणाले.
सातारा येथे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्यास अभिवादन करून ते दौऱ्याला सुरुवात करणार आहेत. रविवार, दि. २९ रोजी सकाळी त्यांनी खासदार उदयनराजे भोसले यांची जलमंदिर निवासस्थानी भेट घेतली. यावेळी खा. उदयनराजे यांनी त्यांचे कंदीपेढे देवून स्वागत केले. तसेच त्यांना परफ्युम भेट दिला. यावेळी दोघांमध्ये अर्धा तास चर्चा झाली.
उदयनराजे म्हणाले, अमित मला खास भेटायला आल्यानंतर मला मुलगा भेटायला आल्यासारखे वाटले. नवीन पिढी राजकारण येतेय ही चांगली गोष्ट आहे. तरुणांनाही पुढे आले पाहिजे. ठाकरे घराण्याचा इतिहास पाहिला तर प्रबोधनकार ठाकरेंपासून बाळासाहेब, उद्धव, राज आता अमित. अमितने नावलौकिक केला पाहिजे. अमितच्या माध्यमातून खूप सेवा मिळो, त्याला खूप आयुष्य लाभो आणि मोठे कार्य घडो असा आशीर्वाद उदयनराजेंनी दिला.
अमित ठाकरे म्हणाले, मी उदयनराजे यांना पहिल्यांदा भेटलो आहे. साताऱ्यात आलो आणि त्यांना भेटलो नाही असे होणार नाही. ही भेट राजकीय नसून वैयक्तिक आहे. आमच्या घराण्याचे आणि राजेंचे खूप जुने संबंध आहेत. राजेंचा स्वभाव खूप दिलखुलास आहे हे ऐकले होते मात्र आज प्रत्यक्ष अनुभवले असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.