गणपतीच्या आरतीला बोलवा म्हणून गेला, अन्...; साताऱ्यात शाळकरी मुलाने संपवलं जीवन 

By दत्ता यादव | Published: September 23, 2023 02:18 PM2023-09-23T14:18:41+5:302023-09-23T14:19:27+5:30

कोंडवेतील घटनेने अनेकांची मने हेलावली

A schoolboy ended his life in Satara | गणपतीच्या आरतीला बोलवा म्हणून गेला, अन्...; साताऱ्यात शाळकरी मुलाने संपवलं जीवन 

गणपतीच्या आरतीला बोलवा म्हणून गेला, अन्...; साताऱ्यात शाळकरी मुलाने संपवलं जीवन 

googlenewsNext

सातारा : क्लासवरून आल्यानंतर सहावीतल्या मुलाने शेजारच्या काकूंना ‘मला गणपतीच्या आरतीला बोलवा, तोपर्यंत मी जेवण करतो,' असं सांगून घरात गेला. तो अखेरचाच. जेवण झाल्यानंतर त्यानं किचनमध्ये गळफास घेऊन आपलं जीवन संपवल. या मुलाच्या आत्महत्येने अनेकांची मने अक्षरश: हेलावून गेली. ही ह्दयद्रावक घटना सातारा शहराजवळील कोंडवे येथे शुक्रवार, दि. २२ रोजी घडली.

सुशांत नीलेश कांबळे (वय १२) असे आत्महत्या केलेल्या शाळकरी मुलाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सुशांत हा शाहूपुरीतील एका शाळेत सहावीमध्ये शिकत होता. शुक्रवारी सकाळी अकरा वाजता तो क्लासवरून घरी आला. त्यावेळी त्याची आई आणि वडील कामावर गेले होते. घराची एक चावी त्याच्याजवळ होती. दरवाजा उघडून तो घरात गेला. तत्पूर्वी त्याने शेजारील काकूंना ‘मला गणपतीच्या आरतीला बोलवा. तोपर्यंत मी जेवण करतो,’ असे सांगितले. 

सकाळी साडेअकरापर्यंत घरात तो एकटाच जेवला. त्यानंतर त्याने किचनमध्ये दोरीच्या साह्याने गळफास घेतला. दरम्यान, बराचवेळ तो घरातून बाहेर आला नाही म्हणून त्याचे मित्र त्याला बघायला घरात गेले. त्यावेळी तो त्यांना लटकलेला दिसला. हे पाहताच मुलांनी आरडाओरड केली. काहींनी सुशांतच्या आई-वडिलांना याची माहिती दिली. सातारा तालुका पोलिस आणि त्याचे आई-वडीलही तातडीने घटनास्थळी आले. त्याच्या गळ्याचा फास काढून त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले.

सुशांतची आई धुणीभांडीचे तर वडील गवंडी काम करत आहेत. हे दोघे रोज सकाळी घराबाहेर पडतात. नेहमीप्रमाणे सुंशातही क्लासला जात होता. घरात कसलाही वाद झाला नाही. असे असताना त्याने कोणत्या कारणातून हे टोकाचे पाऊल उचलले, या विचाराने त्याच्या घरातल्यांना अस्वस्थ करून सोडलं आहे. शाळेत किंवा गावात त्याची कोणासोबत भांडणे झाली होती का, त्याला कोणी रागवले का, याचा आता पोलिस तपास करत आहेत. योगेश पोपट कांबळे (वय ३७, रा. कोंडवे, ता. सातारा) यांनी सातारा तालुका पोलिस ठाण्यात खबर दिली असून, पोलिस नाईक प्रवीण वायदंडे हे अधिक तपास करीत आहेत.

खेळता-खेळता तर हे घडलं नसेल..

सुशांतचे जेवण झाल्यानंतर मुलांसमवेत खेळता-खेळता तर त्याने फास घेतला नसेल ना, अशी शंकाही त्याच्या कुटुंबातील काहींना येत आहे. मुले खेळत होती. तो अगदी आनंदात होता. दोरीचा खेळ खेळताना त्याच्या हातून चुकून गळफास लागला तर नाही ना, याचा सुद्धा आता पोलिसांना तपास करावा लागणार आहे.

Web Title: A schoolboy ended his life in Satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.