सातारा पालिकेतील मुकादमाच्या डोक्यात घातले फावडे, आर्थिक कारणावरून सफाई कर्मचाऱ्याकडूनच मारहाण
By सचिन काकडे | Published: January 11, 2024 07:15 PM2024-01-11T19:15:42+5:302024-01-11T19:16:16+5:30
सातारा : उसने पैसे दिले नाही म्हणून रागाच्या भरात सातारा पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्याने गुरुवार परज येथे मुकादमाच्या डोक्यात फावडे ...
सातारा : उसने पैसे दिले नाही म्हणून रागाच्या भरात सातारा पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्याने गुरुवार परज येथे मुकादमाच्या डोक्यात फावडे घालून त्यांना गंभीर जखमी केले. संतोष खुडे (वय ४३, रा. ढोणे कॉलनी, रामाचा गोट) असे जखमी मुकादमाचे नाव असून, त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले.
याप्रकरणी सतीश मारुती जाधव (रा. आकाशवाणी झोपडपट्टी, सातारा) याच्या विरोधात सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. या तक्रारीनुसार गुरुवारी सकाळी साडेसात वाजता खुडे हे गुरुवार परज येथे कामावर हजर राहून सफाई कर्मचाऱ्यांची हजेरी घेत होते. त्यावेळी सतीश जाधव याने तेथे येऊन 'माझे उसने घेतले आहे. साडेसात हजार रुपये परत दे, नाहीतर तुला बघून घेईल,' असा दम दिला. तसेच रागाच्या भरात शिवीगाळ करत दुसऱ्या कर्मचाऱ्याच्या हातातील फावडे घेऊन त्यांच्या डोक्यात जोरात प्रहार केला. यामध्ये खुडे गंभीर जखमी झाले.
दोघांच्या झटापटीमध्ये इतर सफाई कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी करून भांडण सोडवले. जाधव रागाच्या भरात शिवीगाळ करत तेथून निघून गेला. खुडे यांना अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर त्यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यामध्ये जाधव याच्या विरोधात तक्रार अर्ज दिला आहे. पोलिस अधिक तपास करत आहे.