आईकडून सहा वर्षांच्या चिमुकल्यास चटके देऊन मारहाण, सातारा जिल्ह्यातील संतापजनक घटना
By जगदीश कोष्टी | Published: September 1, 2022 03:48 PM2022-09-01T15:48:10+5:302022-09-01T15:48:38+5:30
संबंधित महिलेकडून पोलिसांचीही दिशाभूल करण्याचा प्रयत्न
शिरवळ : खंडाळा तालुक्यातील भादे हद्दीमध्ये आईने सहा वर्षांच्या लहानग्याला चटके देत बेदम मारहाण केली. या मारहाणीमध्ये संबंधित लहानग्याच्या हाताचे हाड मोडले आहे. त्याच्या अंगावरील मारहाणीच्या खुणा भयानकता दर्शवित आहेत. संबंधित आईकडून पोलिसांचीही दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात आला. शिरवळ येथील खासगी रुग्णालयाचे अस्थी रोग तज्ज्ञ डॉ. सुदर्शन गोरे यांच्या जागरूकतेमुळे हा प्रकार उघडकीस आला.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, शिरवळ पोलीस ठाणे हद्दीमध्ये एका ठिकाणी एक दाम्पत्य आपल्या कुटुंबीयांसमवेत राहण्याकरिता आहे. दरम्यान, संबंधित कुटुंबीयातील अंदाजे ४५ वयाच्या महिलेने गावातीलच एका युवकाबरोबर संधान साधत पोटच्या सहा वर्षांच्या गोळ्याला क्रूरतेचा कळस गाठत अमानुषपणे मारहाण करीत चटके दिले. मारहाणीनंतर संबंधित महिलेने अपघात झाल्याची खोटी माहिती देत एका खासगी रुग्णालयात त्याच्यावर प्रथमोपचार केले.
यावेळी लहानग्याला बेदम मारहाण झाल्याने हाताचे हाड मोडल्याची शक्यता गृहीत धरून संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी लहानग्याला अस्थी रोग तज्ज्ञांकडे दाखविण्याचा सल्ला दिला. त्यानंतर संबंधित महिलेने लहानग्याला नेले. पतीला खोटी माहिती देऊन शिरवळ येथील खासगी रुग्णालयामध्ये सोमवार, २९ ऑगस्ट रोजी आणले. तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. सुदर्शन गोरे यांचीही दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत अपघाताचा बनाव संबंधित महिलेने केला.
यावेळी डॉ. सुदर्शन गोरे यांनी संबंधितांना हाताचा क्ष-किरण चाचणी करणे आवश्यक असल्याचे सांगितले. क्ष-किरण चाचणीनंतर लहानग्याच्या हाताचे हाड मोडल्याचे निदर्शनास आले. ‘पुढील उपचार करणे गरजेचे आहे,’ असे सांगितले असता संबंधित महिलेने ‘पैसे नसल्याचे कारण देत परत दोन दिवसांनी येते,’ असे सांगितले. अपघातानंतर होणारी दुखापत व मारहाणीत होणारी दुखापत याचे निरीक्षण असणारे डॉ. सुदर्शन गोरे यांनी संबंधित महिला पुन्हा दोन दिवसांनंतर रुग्णालयामध्ये लहानग्याला घेऊन आली असता तत्काळ याबाबतची कल्पना शिरवळ पोलिसांना दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत शिरवळ पोलिसांनी तातडीने संबंधित महिलेला व लहानग्याला ताब्यात घेतले.
यावेळी महिलेने शिरवळ पोलिसांचीही दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. शिरवळ पोलिसांनी संबंधित महिलेचा पती व नातेवाइकांना याबाबतची कल्पना दिली असता ते तब्बल चार तासांनी पोलीस ठाण्यात आले. त्यांनी तक्रार देण्यास नकार दिल्याने शिरवळ पोलीसही हतबल झाले.