खेळताना दगडावरून पडून सहा वर्षांच्या बालिकेचा मृत्यू; फलटण येथील घटना
By दत्ता यादव | Updated: January 27, 2024 21:48 IST2024-01-27T21:48:06+5:302024-01-27T21:48:16+5:30
तोल गेल्याने घडली दुर्घटना

खेळताना दगडावरून पडून सहा वर्षांच्या बालिकेचा मृत्यू; फलटण येथील घटना
सातारा : चार फुटांच्या दगडावर चढून खेळत असताना अचानक तोल जाऊन पडून एका सहा वर्षांच्या बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना फलटण तालुक्यातील निरगुडी येथे दि. २६ रोजी सायंकाळी पाच वाजता घडली.
आर्या शशिकांत लकडे (वय ६), असे दुर्दैवी बालिकेचे नाव आहे. याबाबत फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, आर्या लकडे हिचे कुटुंब मेंढपाळ आहे. सर्व जण मेंढरं घेऊन शिवारात गेले होते. त्यावेळी आर्या तिच्या आजीजवळ होती. घरासमोर असलेल्या चार फूट दगडावर चढून ती खेळत होती. त्यावेळी अचानक तिचा तोल गेल्याने ती खाली पडली. त्यानंतर रडू लागली. तिला तातडीने फलटण येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे निरगुडी गावात शोककळा पसरली आहे. या घटनेची फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.