भरधाव ट्रकची दोन दुचाकींना धडक; एक जण ठार, शेंद्रेजवळ अपघात
By नितीन काळेल | Published: October 20, 2023 08:21 PM2023-10-20T20:21:39+5:302023-10-20T20:22:54+5:30
जखमी दोघांवर साताऱ्यातील रुग्णालयात उपचार
नितीन काळेल, लोकमत न्यूज नेटवर्क, सातारा: पुणे-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावर शेंद्रेजवळ भरधाव ट्रकने पाठीमागून दोन दुचाकींना धडक दिली. यामध्ये एकजण ठार तर दोघे जखमी झाले आहेत. मृत सातारा तालुक्यातील कुसवडे येथील आहे. तर याप्रकरणी सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शुक्रवारी सकाळी आठच्या सुमारास सातारा तालुक्यातील खिंडवाडीकडून शेंद्रेकडे महामार्गावरुन फरशी भरलेला ट्रक (एचआर, ७४ ए, ६००७) जात होता. भरधाव वेगात हा ट्रक होता. या ट्रकची शेंद्रे गावच्या हद्दीत दोन दुचाकींना पाठीमागून जोराची धडक बसली. यामध्ये प्रदीप शंकर सराटे (वय ५०, रा. कुसवडे, ता. सातारा) हे ठार झाले. तर त्यांच्याच दुचाकीवरील अनिल बबन महाडिक (वय ५०, रा. कुसवडे) हे गंभीर जखमी झाले. तर दुसऱ्या दुचाकीवरील राजेश श्रीरंग पवार (रा. प्रतापगंज पेठ, सातारा) हेही जखमी झाले. अपघातानंतर जखमी दोघांना साताऱ्यातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर यातील मृत प्रदीप सराटे आणि अनिल महाडिक हे दोघेजण सातारा आैद्योगिक वसाहतीत सुरक्षारक्षक म्हणून काम करतात. काम करुन घरी जाताना हा अपघात झाला. तर या अपघातानंतर ट्रक चालक पळून गेला. तर पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला आहे.
या अपघाताची नोंद सातारा तालुका पोलिस ठाण्यात झाली आहे. याबाबत पोलिस अधिक माहिती घेत आहेत.