साताऱ्यात पावसाचा शिडकावा, उकाड्यापासून काहिसा दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2024 01:02 PM2024-03-29T13:02:15+5:302024-03-29T13:02:59+5:30
सातारा : साताऱ्यासह जिल्ह्यातील बहुतांश भागात मार्च अखेरीपासूनच सूर्यनारायण आग ओकायला लागले आहेत. दोन दिवसांपासून साताऱ्याचा पारा सरासरी ३९ ...
सातारा : साताऱ्यासह जिल्ह्यातील बहुतांश भागात मार्च अखेरीपासूनच सूर्यनारायण आग ओकायला लागले आहेत. दोन दिवसांपासून साताऱ्याचा पारा सरासरी ३९ अंश सेल्सिअसच्या घरात पोहोचला आहे. यामुळे बहुतांश भागात प्रचंड उकाडा जाणवत असून अंगाची लाहीलाही होत आहे. अशातच काल, गुरुवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास पावसाचा शिडकावा झाला.
साताऱ्यात कडक ऊन पडत आहे. यामुळे गेल्या काही दिवसांपासून शहरातील मुख्य रस्ते ओस पडत आहेत. सकाळी सात वाजेपासून कडक ऊन पडत असते. साडेआठ नंतर तर सूर्यनारायण तळपायला सुरुवात करतात. मात्र, गुरुवारी दुपारनंतर ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. अशातच दुपारी साडेतीनच्या सुमारास पावसाचे थेंब पडण्यास सुरुवात झाली. त्यामुळे मुलांनी पावसात भिजण्याचा आनंद घेतला. तर, शेतकऱ्यांनी ज्वारी, कडधान्य उन्हात वाळू घातलेले आहे. पावसाला सुरुवात झाल्याने ते काढण्यासाठी सर्वांची पळापळ झाली होती.