दिवशी घाटात वीज अंगावर पडल्याने शिक्षकाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2023 11:25 PM2023-04-19T23:25:58+5:302023-04-19T23:26:23+5:30
दुपारी चार वाजता ते दिवशी घाटात जुळेवाडी स्टॉपच्या थोडेसे पुढे आले. यावेळी जोराच्या वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात पाऊस सुरू झाला होता. यावेळी त्यांचा मृत्यू झाला.
सणबूर : पाटण तालुक्यातील दिवशी घाटात जुळेवाडी स्टॉपपासून ढेबेवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर बुधवारी दुपारी सोसाट्याच्या वाऱ्यासह पडलेल्या पावसात संतोष शंकरराव यादव (वय ४०) या शिक्षकाच्या अंगावर वीज पडली. यात त्यांचा मृत्यू झाला. मृतदेह पोलिसांनी शवविच्छेदनासाठी कऱ्हाडला पाठविला आहे. शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होणार आहे.
याबाबत माहिती अशी की, संतोष यादव हे ढेबेवाडी विभागातील डोंगर पठारावरील कसणी येथील प्राथमिक शाळेत शिक्षक होते. बुधवारी शालेय पोषण आहारचे ऑडिट करण्यासाठी पाटण येथे गेले होते. काम संपवून ते दुपारी निघाले. दुपारी चार वाजता ते दिवशी घाटात जुळेवाडी स्टॉपच्या थोडेसे पुढे आले. यावेळी जोराच्या वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात पाऊस सुरू झाला होता. यावेळी त्यांचा मृत्यू झाला.
या धक्कादायक प्रसंगाने शोककळा पसरली आहे. संतोष यादव हे २०१८ पासून ढेबेवाडी विभागात नोकरी करीत होते. ते मूळचे वाई तालुक्यातील असून त्यांची नुकतीच वाई तालुक्यात बदली झाली होती. ते त्यांच्या गावापासूनच्या जवळच्या शाळेत जाणार होते. तोच त्यांच्यावर काळाचा घाला घातला आहे. एक चांगला शिक्षक गेल्याने प्राथमिक शिक्षक वर्गात शोककळा पसरली आहे.
यावेळी प्रदीप घाडगे, राजू पवार, रामभाऊ, नाना कदम या शिक्षकांसह अनेक शिक्षकांनी घटनास्थळी धाव घेतली होती. ढेबेवाडीचे सहायक पोलिस निरीक्षक अभिजीत चौधरी यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन मृतदेह कऱ्हाड येथे शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.