पसरणी येथे ऊसाने भरलेला ट्रक कालव्यात पलटी, चालकाने ट्रकमधून उडी घेतल्याने अनर्थ टळला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2022 04:38 PM2022-03-12T16:38:21+5:302022-03-12T16:38:58+5:30
स्थानिक तरुणांच्या मदतीने ट्रकला दोरखंड बांधून ट्रक पलटी होण्यापासून वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र अखेर ट्रक कालव्यात पलटी झाला.
वाई : पसरणी येथील भैरवनाथनगर येथील कालव्यात ऊसाने भरलेला ट्रक (केए २५ ऐ २१६४) पलटी झाला. ट्रकचालकाने प्रसंगावधान दाखवत वेळीच ट्रकमधून उडी घेतल्याने अनर्थ टळला. हा अपघात शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास झाला.
ट्रक कालव्यात पलटी झाल्याने पाणी तुंबून लाखो लिटर पाणी वाया गेले. ही मािहती समजल्यावर धोम पाटबंधारे विभागाने तातडीने पाणीपुरवठा बंद केला.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, पसरणी येथील भैरवनाथ नगर नावाच्या शिवारामध्ये बबन शिर्के यांच्या शेतात ऊसतोड सुरू होती. बीड येथील ऊसतोड कामगारांनी सायंकाळी सहाच्या सुमारास उसाने भरलेला ट्रक शिवारातून बाहेर काढला. ट्रक चालक विठ्ठल राठोड व अन्य दोघेजण ट्रकमधून कऱ्हाड येथील रयत कारखान्याकडे निघाला होता.
धोम डाव्या कालव्याच्या शेजारील रस्त्याने ऊसाने भरलेला ट्रक घेऊन जाताना मागील चाक जमिनीमध्ये रुतल्याने ट्रक एका बाजूला कलू लागला. गांभीर्य लक्षात आल्याने त्याने त्वरित खाली उतरून स्थानिक तरुणांच्या मदतीने ट्रकला दोरखंड बांधून ट्रक पलटी होण्यापासून वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र अखेर ट्रक कालव्यात पलटी झाला. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. अनेकांनी हा प्रसंग मोबाईलमध्ये कैद केला.
ऊसाने भरलेल्या संपूर्ण ट्रक कॅनॉलमध्ये पलटी झाल्याने कॅनॉलचे पाणी तुंबले व शेजारील कुंड्यांमध्ये वाहू लागले. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले. मात्र कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले नाही. सायंकाळी दहाच्या सुमारास क्रेनच्या सहाय्याने ट्रक कालव्यातून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु होते. अथक प्रयत्नानंतर ट्रक बाहेर काढण्यात आला.