पालखी मार्गांवर साक्षरतेचा जागर!, सातारा जिल्ह्यात लोणंद व फलटण येथे असाक्षरांची नोंदणी
By प्रगती पाटील | Published: July 16, 2024 07:27 PM2024-07-16T19:27:13+5:302024-07-16T19:28:04+5:30
घोषणा फलक ठरले लक्षवेधी
सातारा : साक्षरतेच्या नाविन्यपूर्ण घोषणा व गीतांचे गायन, माहिती पत्रकांचे वाटप, साक्षरता रथाद्वारे प्रचार, साक्षरता दिंडी अन् असाक्षरांची मुक्कामाच्या ठिकाणी नोंदणी अशा उपक्रमांनी संतश्रेष्ठ तुकाराम महाराज व जगद्गुरु तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात पंढरपूरपर्यंत उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रमाविषयी जनजागृती करण्यात आली.
केंद्र पुरस्कृत ‘उल्लास’च्या प्रचारासाठी योजना शिक्षण संचालनालय आयोजित ‘वारी साक्षरते’ची या अनुषंगाने राज्यभर विविध उपक्रम सुरू आहेत. ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावर लोणंद व फलटण येथे शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर व उपसंचालक राजेश क्षीरसागर यांच्या उपस्थितीत साक्षरतेचा जागर करण्यात आला. पंढरपूर येथून साक्षरता वारीतील कार्यक्रमाचे समाज माध्यमांवर थेट प्रक्षेपणही करण्यात आले.
फलटण येथे सकाळी मालोजीराजे शेती विद्यालयापासून जिंती नाका परिसरात मुख्य रस्त्यावर साक्षरता दिंडी काढण्यात आली. राज्य योजना शिक्षण उपसंचालक राजेश क्षीरसागर, विस्तार अधिकारी चन्नय्या मठपती, केंद्रप्रमुख दमयंती कुंभार, प्राचार्य ज्ञानदेव कोळेकर यांच्यासह विविध शाळांतील विद्यार्थी, शिक्षक, नागरिक, योजना संचालनालयाचा साक्षरता रथही सहभागी झाले.
जिंती नाका येथे पंचायत समितीने फलटण एज्युकेशन सोसायटीचे सचिव संजीवराजे निंबाळकर, प्रशासनाधिकारी अरविंद निकम यांच्या मदतीने उभारलेल्या मंचावरून सादर केलेल्या नाविन्यपूर्ण घोषणा व गीते वारकऱ्यांसाठी आकर्षण ठरली. शिवाजी भोसले शुभांगी बोबडे यांनी साक्षरता गीतांचे गायन केले. सागर जाधव उत्तम घोरपडे, मनोज कदम यांनी खुमासदार शैलीत वारकऱ्यांसाठी निवेदन केले. फलटण येथे साक्षरता रथाचे स्वागत फलटण एज्युकेशन सोसायटीचे तुषार निंबाळकर, विठ्ठल साळवे यांनी केले.
फलटण व खंडाळा तालुक्यातील विविध शाळांमध्ये बाल वारकऱ्यांची साक्षरता दिंडी निघाली. यामध्येही साक्षरतेचा घोषणा, साक्षरता गीते यांचा समावेश होता. विशेषत: पालखी मार्गावरील शाळांमधील उत्साह प्रशंसनीय होता. उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रमाच्या शाळा-शाळांमधून माहितीपत्रक (घडीपत्रिका)चे वाटप करण्यात आले. संभाजी देशमुख यांच्या नेतृत्वाखाली संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावर तर रमेश कवितके यांच्या नेतृत्वाखाली संत तुकाराम महाराज पालखी मार्गावर पथकांनी रथाद्वारे साक्षरतेचा जागर केला.
घोषणा फलक ठरले लक्षवेधी
गेले सांगून ज्ञाना-तुका, झाला उशीर तरीही शिका, वारीत भक्तीभावाने चालणार, गावी गेल्यावर मनोभावे शिकणार, अक्षर अक्षर गिरवूया, साक्षर भारत घडवूया, साक्षरतेकडून समृद्धीकडे, जन जन साक्षर अशा घोषणा देत हातात फलक घेऊन दिंडीकऱ्यांनी सर्वांचे लक्ष वेधले. केंद्र शासनाने दखल घेतलेल्या बारामतीच्या सुशीला व रुचिता या आजी-नातीचे, चिंचणी-सातारच्या बबई मस्कर यांची छायाचित्रे, रत्नागिरीच्या अनन्या चव्हाण हिची कलाकृती, उल्लास कार्यक्रमाची माहिती व वैशिष्ट्ये साक्षरता रथावर दर्शवण्यात आली होती.