अवघ्या ३५ दिवसांत एका महिलेने घरकूल बांधले, सातारा जिल्ह्यात आतापर्यंत २७४ घरांचे काम पूर्णत्वास
By नितीन काळेल | Updated: March 27, 2025 19:28 IST2025-03-27T19:27:27+5:302025-03-27T19:28:55+5:30
जिल्ह्यात ३७ हजार निवाऱ्यांसाठी मंजुरी

अवघ्या ३५ दिवसांत एका महिलेने घरकूल बांधले, सातारा जिल्ह्यात आतापर्यंत २७४ घरांचे काम पूर्णत्वास
सातारा : जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत वेगाने कामे सुरू असून आतापर्यंत ३७ हजारांवर घरकुलांना मंजुरी मिळाली आहे. त्यातील २८ हजार लाभाऱ्श्यांना पहिला हप्ताही मिळाला आहे. विशेष म्हणजे सुरुपखानवाडीत अवघ्या ३५ दिवसांत एका महिलेने घरकूल बांधले. तसेच जिल्ह्यात आतापर्यंत २७४ घरकुले पूर्णत्वास गेली आहेत.
सातारा जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत घरकुलांची कामे सुरू आहेत. जिल्ह्यास मंजूर उद्दिष्टांनुसार पात्र लाभार्थ्यांना जलद गतीने घरकुले मंजूर केली जात आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात ३७,३८७ घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे. तर २८ हजार ७२४ लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरीत करण्यात आलेला आहे. आतापर्यंत २७४ घरकुले पूर्णत्वास गेली आहेत.
जिल्ह्यातील विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे माण तालुक्यातील सुरुपखानवाडी ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील संगीता उत्तम कदम यांनी केवळ ३५ दिवसांत घरकुल बांधून पूर्ण केले आहे. हा जिल्ह्यातील एक विक्रम ठरला आहे. कारण, यापूर्वी २०२६-१७ मध्ये माण तालुक्यातीलच गोंदवले खुर्द येथील शालन बबन निंबाळकर यांनी ६१ दिवसांत घरकुल बांधण्याचा उच्चांक प्रस्थापित केला होता.
जिल्ह्यात प्रधानमंत्री आवासमधील घरकुल बांधणी जलदगतीने सुरू आहे. आतापर्यंत २७४ घरकुले बांधून पूर्ण झालेली आहेत. लाभार्थ्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्यात येत आहे. त्याचबरोबर प्रशासन आणि ग्रामपंचायतीच्या समन्वयाने हे काम अधिक वेगाने पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. - याशनी नागराजन, मुख्य कार्यकारी अधिकारी