Satara: जेवण न बनविल्याच्या रागातून महिलेचा खून, ऊसतोड मजुराला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2024 06:09 PM2024-11-05T18:09:51+5:302024-11-05T18:10:07+5:30

महिलेला दांडक्याने केली मारहाण

A woman was beaten to death with a wooden stick for not having cooked food in karad | Satara: जेवण न बनविल्याच्या रागातून महिलेचा खून, ऊसतोड मजुराला अटक

Satara: जेवण न बनविल्याच्या रागातून महिलेचा खून, ऊसतोड मजुराला अटक

कऱ्हाड : जेवण बनविले नसल्याच्या कारणावरून महिलेला लाकडी दांडक्याने मारहाण करीत तिचा खून करण्यात आला. रेठरे खुर्द, ता.कऱ्हाड येथे वाठार ते रेठरे जाणाऱ्या मार्गालगत मोहिते मळा नावच्या शिवारात शुक्रवारी रात्री ही घटना घडली. या प्रकरणी एकाला पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केले आहे.

सिंधू जाधव (वय ६५, रा.डोंगरसुनी-सावळज, ता.तासगाव, जि.सांगली) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी ऊसतोड कामगार विठ्ठल ज्ञानदेव चौगुले (वय ५२, रा.शिरशी, ता.सांगोला, जि.सोलापूर) याला अटक करण्यात आले आहे.

रेठरे खुर्द येथील जगन्नाथ बापू मोहिते यांचे जनावरांचे शेड वाठार ते रेठरे जाणाऱ्या मार्गालगतच्या मोहिते मळा नावच्या शिवारात आहे. शनिवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास काही शेतकरी या शिवारात गेले असता, जगन्नाथ मोहिते यांच्या शेडनजीक सिंधू जाधव ही महिला नग्नावस्थेत मृत पडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर कऱ्हाड ग्रामीण पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी त्या ठिकाणी दाखल झाले. त्यांनी मृतदेहाची पाहणी केली असता, सिंधू जाधव हिच्या अंगावर मारहाण केल्याच्या खुणा दिसत होत्या.

पोलिसांनी अधिक चौकशी केली असता, जगन्नाथ मोहिते यांच्या शेडजवळ सिंधू जाधव ही महिला ऊसतोड मजूर विठ्ठल चौगुले याच्यासह झोपडीत राहण्यास होती, असे निष्पन्न झाले. संशय आल्यामुळे पोलिसांनी विठ्ठल चौगुले याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता, शुक्रवारी दि. १ रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास जेवण बनवले नाही, या कारणावरून सिंधू जाधव हिला मारहाण केल्याचे त्याने सांगितले. या मारहाणीत सिंधू जाधव हिचा मृत्यू झाल्याचे पोलिस चौकशीतून समोर आले आहे. पोलिस उपनिरीक्षक अब्दुलहदी बिद्री तपास करीत आहेत.

डोक्याला झालेल्या दुखापतीमुळे मृत्यू..

विठ्ठल चौगुले याने लाकडी दांडक्याने सिंधू जाधव हिच्या डोक्यात, पायावर, तसेच हातावर मारहाण केली. तिला झोपडीतून बाहेर ओढले, तसेच कपडे काढून जमिनीवर ढकलून दिले, असे पोलिस तपासातून उघडकीस आले आहे. पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला असता, डोक्याला झालेल्या दुखापतीमुळे सिंधू जाधव हिचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी याबाबतचा अहवाल पोलिसांना दिला आहे.

Web Title: A woman was beaten to death with a wooden stick for not having cooked food in karad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.