Satara News: दुचाकी घसरुन फरफटत गेले, अज्ञात वाहनाखाली येवून चिपळूणच्या अभियंत्या तरुणीचा जागीच मृत्यू; हेल्मेटमुळे पती वाचला
By दत्ता यादव | Published: March 14, 2023 01:36 PM2023-03-14T13:36:29+5:302023-03-14T13:42:05+5:30
दोन दिवसांपूर्वी दोघेही सुटीसाठी चिपळूणला गेले होते. सुटी संपवून दुचाकीवरुन पुण्याला निघाले असता घडली दुर्घटना
सातारा : चिपळूणहून पुण्याला निघालेल्या अभियंत्या दाम्पत्याची दुचाकी घसरून झालेल्या अपघातात तरुणीचा मृत्यू झाला तर पती गंभीर जखमी झाला. तेजस्वी गौरव पेवेकर (वय २१, रा. कळवंडे चिपळूण, जि. रत्नागिरी) असे अपघातात ठार झालेल्या तरुणीचे नाव आहे. हा अपघात काल, सोमवारी रात्री उशिरा बोरगाव, ता. सातारा गावच्या हद्दीत झाला.
याबाबत बोरगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, तेजस्वी पेवेकर आणि गाैरव पेवेकर हे दोघे अभियंते असून, ते पुण्यातील एका कंपनीत नोकरी करतात. दोन दिवसांपूर्वी दोघेही सुटीसाठी चिपळूणला गेले होते. सुटी संपवून सोमवारी दुपारी ते दुचाकीवरून पुण्याला निघाले. बोरगाव, ता. सातारा गावच्या हद्दीत रात्री पावणेआठ वाजता पोहोचले. त्यावेळी महामार्गावरून जाताना अचानक दुचाकी घसरली. साधारण वीस फूट फरफटत पुढे गेली तर पाठीमागे बसलेली तेजस्वी ही महामार्गावर खाली पडली.
दरम्यान, पाठीमागून आलेले अज्ञात वाहन तिच्या डोक्यावरून गेले. यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. पतीने हेल्मेट घातले असल्यामुळे फारसे ते जखमी झाले नाहीत. या अपघाताची माहिती बोरगाव पोलिसांना समजल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह महामार्गावरून बाजूला घेण्यात आला. तर जखमी पतीला पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले. या अपघाताची नोंद बोरगाव पोलिस ठाण्यात झाली आहे.
‘स्पीड लेन’ला अपघात
ज्या स्पीड लेनवरून वाहने धावतात. त्याच लेनवर हा अपघात झाला. पाठीमागून भरधाव आलेले वाहन तेजस्वीच्या डोके आणि अंगावरून गेले. त्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. स्पीड लेनला जर हा अपघात झाला नसता तर तेजस्वीचा जीव वाचला असता, असे पोलिस सांगतायत. कोणत्या वाहनाखाली तेजस्वी सापडली, हे शोधण्यासाठी पोलिसांनी टोलनाक्यावरील सीसीटीव्ही तपासण्यास सुरुवात केली आहे.