Satara: बनावट ॲपच्या माध्यमातून तरुणाला १३ लाख रुपयांचा गंडा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2024 02:10 PM2024-10-21T14:10:10+5:302024-10-21T14:10:36+5:30
शिरवळ (जि. सातारा) : खासगी कंपनीत सुरक्षा अधिकारी म्हणून कार्यरत असणाऱ्या पळशी येथील एका युवकाला शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याकरिता ...
शिरवळ (जि. सातारा) : खासगी कंपनीत सुरक्षा अधिकारी म्हणून कार्यरत असणाऱ्या पळशी येथील एका युवकाला शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याकरिता ॲप डाउनलोड करायला लावून सायबर चोरट्यांनी तब्बल १३ लाख ३९ हजार ७७० रुपयांचा ऑनलाइन गंडा घातला. पंकज महादेव चव्हाण, असे गंडा घातलेल्या तरुणाचे नाव आहे.
पळशी येथील पंकज चव्हाण हा २५ फेब्रुवारी ते ३१ जुलै यादरम्यान एक व्हिडीओ पाहत असताना गुंतवणूक संबंधित ॲपबाबत माहिती मिळाली. या ॲपमध्ये गुंतवणूक केल्यास गुंतविलेल्या रकमेवर दररोज १ टक्के रक्कम मिळणार, असे दर्शविले होते. त्यानुसार पंकज चव्हाण यांनी ते ॲप डाउनलोड करीत कागदपत्रांची पूर्तता केली.
पंकज चव्हाण याने क्रेडिट कार्डच्या माध्यमातून १३ लाख ३९ हजार ७७० रुपये गुंतविले. १२ ऑगस्ट रोजी पैसे काढण्याचा प्रयत्न केला असता, पैसे निघाले नाहीत. तसेच संबंधित ॲप प्ले स्टोअरवर दिसत नसल्याने ऑनलाइन सायबर चोरट्यांनी फसवणूक केल्याचे निदर्शनास आले. पंकज चव्हाण यांनी सायबर क्राइम पोर्टलवर तक्रार दाखल केली.