पोलिसाने पैसे खाल्ले, अन् मला शिक्षा झाली; चिठ्ठीत पोलिसाचे नाव लिहून तरूणाची आत्महत्या
By दत्ता यादव | Published: August 6, 2022 02:47 PM2022-08-06T14:47:27+5:302022-08-06T19:16:45+5:30
काही महिन्यांपूर्वी त्याच्या पत्नीने कौटुंबिक वादातून विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली होती. याप्रकरणात तो तीन महिने कारागृहात होता.
सातारा : पोलिसाने पैसे खाल्ले. त्यामुळे मला तीन महिने शिक्षा झाली, अशी चिठ्ठी लिहून एका तरूणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना आज, शनिवारी दुपारी साताऱ्यात उघडकीस आली. उमेश रमेश जाधव (वय ३४, रा. रविवार पेठ, सातारा) असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, साताऱ्यातील रविवार पेठेमधील एका अपार्टमेंटमध्ये उमेश जाधव हा वास्तव्यास होता. काही महिन्यांपूर्वी त्याच्या पत्नीने कौटुंबिक वादातून विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली होती. याप्रकरणात तो तीन महिने कारागृहात होता.
काही दिवसांपूर्वीच तो जामिनावर सुटला होता. आज, शनिवारी दुपारच्या सुमारास त्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या खिशामध्ये पोलिसांना चिठ्ठी सापडल्यानंतर आत्महत्या पाठीमागचं धक्कादायक कारण समोर आलं.
चिठ्ठीत काय आहे उल्लेख...
माझी पत्नी आईकडे गेली होती. परत आल्यानंतर तिने आत्महत्या केली. याला कारण एक महिला आणि पुरुष आहे. त्या दोघांच्यामुळे मी आत्महत्या करतोय. मला जेलमध्ये टाकण्यासाठी त्या दोघांनी एका पोलिसाला पैसे दिले. त्यामुळे मला शिक्षा झाली. आता त्या दोघांवर ३०२ चा गुन्हा दाखल करावा, असे आत्महत्यापूर्वी उमेश जाधवने चिठ्ठीमध्ये लिहून ठेवले होते.