Satara: महामार्ग ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू, पोलिसांकडून शोध सुरू
By दत्ता यादव | Published: December 7, 2023 12:39 PM2023-12-07T12:39:57+5:302023-12-07T12:40:12+5:30
सातारा: महामार्ग ओलांडत असताना एका तरूणाच्या पोटावर अज्ञात वाहनाचे चाक गेल्याने त्याचा रुग्णालयात नेण्यापूर्वीच मृत्यू झाला. सुनील यशवंत मोहिते (वय २१, रा. शेंद्रे, ता. सातारा) असे मृत ...
सातारा: महामार्ग ओलांडत असताना एका तरूणाच्या पोटावर अज्ञात वाहनाचे चाक गेल्याने त्याचा रुग्णालयात नेण्यापूर्वीच मृत्यू झाला. सुनील यशवंत मोहिते (वय २१, रा. शेंद्रे, ता. सातारा) असे मृत तरूणाचे नाव आहे. हा अपघात शेंद्रे, ता. सातारा येथे काल, बुधवारी रात्री झाला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर शेंद्रे, ता. सातारा जवळील एका हॉटेलसमोरून सुनील मोहिते हा महामार्ग ओलांडत होता. त्यावेळी सातारा बाजूकडून आलेल्या अज्ञात वाहनाने त्याला जोरदार धडक दिली. यात तो खाली पडला. त्यानंतर त्याच्या पोटावरून वाहनाचे चाक गेले. यामध्ये तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
या अपघातानंतर सातारा तालुका पोलिस ठाण्यातील हवालदार विशाल मोरे यांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून घटनास्थळाचा पंचनामा केला. महामार्गालगत असलेल्या सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम त्यांनी तत्काळ हाती घेतले. सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतरच कोणत्या वाहनाने सुनीलला धडक दिली. हे समोर येणार आहे. सातारा तालुका पोलिस ठाण्यात या अपघाताची नोंद झाली आहे.