साताऱ्याच्या तरुणाला एक कोटीला गंडा, शेअर मार्केटमधील गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2024 04:57 PM2024-06-25T16:57:16+5:302024-06-25T16:57:42+5:30
उच्चशिक्षित तरुणही आमिषाला बळी पडत असल्याने पोलिसही अवाक्
सातारा : शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने एका तरुणाची तब्बल १ कोटी ८ लाख ४० हजार ४५७ रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी सातारा तालुका पोलिस ठाण्यात कलिस्ता शर्मा, देव शहा, किकी शहा, सिद्धार्थ सिंग (आरोपींचे पत्ते फिर्यादीला माहीत नाहीत) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
सातारा तालुक्यातील आरळे येथील स्वप्निल भानुदास घाडगे (३०) हा तरुण साॅफ्टवेअर कंपनीत नोकरी करतो. वरील संशयितांनी त्याला शेअर मार्केटच्या ॲपमध्ये गुंतवणूक करण्यास सांगितले. त्यानुसार घाडगे याने ऑनलाइन बॅँकिंग पद्धतीने एचडीएफसी बँकेच्या अकाउंटवरून ४२ लाख ५० हजार रुपये संशयितांना पाठवले. तसेच त्याचे वडील भानुदास घाडगे यांच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अकाउंटवरून ६५ लाख ९० हजार ४५७ रुपयांची रक्कम पाठविली. मात्र, संशयितांनी रक्कम परत न करता त्याची फसवणूक केली.
या प्रकारानंतर स्वप्निल घाडगे याने सातारा तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिस निरीक्षक नीलेश तांबे हे अधिक तपास करीत आहेत.
..अशी झाली फसवणूक
स्वप्नील घाडगे हा साॅफ्टवेअर इंजिनिअर आहे. तो एका कंपनीत काम करतो. १७ मार्च २०२४ ते ५ जून या कालावधीत त्याची संशयित कलिस्ता शर्मा याच्याशी ओळख झाली. शेअर मार्केटमध्ये प्रचंड नफा असून, पैसे गुंतवण्याचे त्याने सांगितले. त्यासाठी कलिस्ता शर्माने त्याला पैसे पाठविण्यासाठी वेगवेगळ्या बँकांचे खाते नंबर दिले. त्या खात्यावर स्वप्नील घाडगे याने पैसे भरले. जादा रक्कम मिळेल, या आशेने संशयित सांगेल तेवढे पैसे तो बँकेत भरत गेला. मात्र, आणखी मागणी होऊ लागल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे त्याचे लक्षात आले. त्यानंतर त्याने पोलिसात धाव घेतली. उच्चशिक्षित तरुणही अशाप्रकारच्या आमिषाला बळी पडत असल्याने पोलिसही अवाक् झाले आहेत.