साताऱ्यात ट्रकच्या चाकाखाली सापडून तरूणी ठार
By दत्ता यादव | Published: December 3, 2023 02:08 PM2023-12-03T14:08:10+5:302023-12-03T14:08:47+5:30
रविवारी सकाळी ती दुचाकीवरून साताऱ्याकडे यायला निघाली
सातारा: सातारा-कोरेगाव रस्त्यावर संगम माहुलीजवळ ट्रकच्या पुढील चाकाखाली सापडून एका १९ वर्षीय तरूणीचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात रविवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास झाला. दिशा उदय घोरपडे (वय १९, मूळ रा. शिरढोण, ता. कोरेगाव, सध्या रा. सदर बझार सातारा) असे अपघातात ठार झालेल्या तरूणीचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दिशा घोरपडे ही शनिवारी सोनगाव, ता. सातारा येथे मामाकडे गेली होती.
रविवारी सकाळी ती दुचाकीवरून साताऱ्याकडे यायला निघाली. संगम माहुलीजवळ आल्यानंतर ट्रकला ओव्हरटेक करून ती पुढे गेली. मात्र, तिची दुचाकी अचानक घसरल्याने ती ट्रकखाली सापडली. त्यामुळे ट्रकचे पुढील चाक तिच्या डोक्यावरून गेले. यात तिचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळाचे चित्र विदारक होते. छिनविच्छिंन्न मेंदू आणि रक्ताचा सडा पडला होता. या अपघाताची माहिती मिळताच सातारा शहर पोलिस ठाण्यातील हवालदार कारळे व हवालदार धनाजी यादव हे तातडीने घटनास्थळी पोहोचले. या अपघामुळे वाहतूक कोंडी झाली होती. ही वाहतूक कोंडी त्यांनी पूर्ववत केली. मृत तरूणीचा मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला.
या अपघाताची माहिती मृत दिशा घोरपडे हिच्या आई-वडिलांना समजल्यानंतर दोघेही सिव्हिलमध्ये आले. मुलीचा मृतदेह पाहून त्यांनी प्रचंड आक्रोश केला. त्यांनी केलेला आक्रोश अक्षरश: काळीज पिळवटून टाकणारा होता. दिशा ही साताऱ्यातील यशोदा शिक्षण संस्थेमध्ये फार्मसीच्या पहिल्या वर्षात शिक्षण घेत होती. तिचे आई-वडील शिक्षक असून, तिला एक बहीण आहे. या अपघाताची सातारा शहर पोलिस ठाण्यात नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.
दुभाजकाने घेतला ‘तिचा’ बळी
कोरेगाव-सातारा रस्त्याचे गेल्या अनेक दिवसांपासून सिमेंट काॅंक्रिट रस्त्याचे काम सुरू आहे. बाॅम्बे रेस्टाॅरंट ते संगम माहुलीपर्यंत काम बऱ्यापैकी पूर्ण झाले आहे. मात्र, दुभाजकाचे काम अर्धवट आहे. सिमेंटचा रस्ता झाल्यामुळे त्याची उंची वाढली. वाहन खाली उतरताना स्लोप न ठेवल्यामुळे वाहनांचा अपघात होत आहे. दिशा घोरपडे हिचाही अशाच प्रकारे अपघात झाला असल्याचा आरोप यावेळी नातेवाईकांनी केला. संबंधित ठेकेदारावरही गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.